२२७ कामगारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 09:10 PM2019-12-16T21:10:36+5:302019-12-16T21:12:54+5:30
मोहता इंडस्ट्रीने प्रोसेस डिपार्टमेंट बंद केल्याने येथील २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. हा विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोहता इंडस्ट्रीने प्रोसेस डिपार्टमेंट बंद केल्याने येथील २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. हा विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे शासनाने हा विभाग बंद करण्याची परवानगी देऊ नये, या मागणीला घेऊन राष्ट्रीय मिल मजूदर संघाच्यावतीने (इंटक) सोमवारी विधिमंडळावर मोर्चा काढून जोरदार नारेबाजी केली.
या मोर्चात सहभागी झालेले प्रवीण चौधरी म्हणाले, या कंपनीमध्ये ६५० कामगार आहेत. कंपनीचा प्रोसेस विभाग बंद पाडल्याने २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. या कामगारांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे. यामुळे इतरत्र त्यांना नोकरी मिळणे कठीण आहे. यामुळे शासनाने यात लक्ष घालून कामगारांचे हक्क मिळवून देणे आवश्यक आहे. कापड खात्यातील २४९ कामगारांच्या प्रश्नावर मजदूर संघ व व्यवस्थापनाने बसून योग्य तोडगा काढावा, असे निर्देशही शासनाने द्यावे, असेही ते म्हणाले.
नेतृत्व
मोर्चाेच नेतृत्व माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, आफताब खान यांनी केले. शिष्टमंडळात तिमांडे, खान यांच्यासह प्रवीण चौधरी, उज्ज्वला भगत, रुपाली धोटे आदींचा सहभाग होता.
मागण्या
- २२७ बेरोजगार कामगारांचा प्रश्न शासनाने सोडवावा.
- अप्पर कामगार आयुक्तांनी कंपनीला विभाग बंद करण्याची परवानगी देऊ नये
- कामगारांना कायदेशीर हक्क शासनाने मिळवून द्यावे
२६ एकर जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवा
भंडारा जिल्ह्यातील ग्रा. पं. राजेगाव हद्दीतील चिखली-हमेशा येथील २६ एकर सरकारी जागेवर गेल्या ३७ वर्षांपासून गडेगाव (भंडारा) येथील अशोक लेलँड कंपनी लि.ने अतिक्रमण केले आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्यात आला आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी व अतिक्रमण तातडीने हटवावे, या मागणीसाठी राजेगाव (एमआयडीसी) ग्रामवासीयांनी विधिमंडळावर मोर्चा काढून लक्ष वेधले. मोर्चाचे नेतृत्व अचल मेश्राम, कुंजन शेंडे, शशी भोयर, अनिता शेंडे, शालिक गभाने, देवराव वासनिक आदींनी केले.