भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:27+5:302021-03-10T04:10:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : स्थानिक वीज वसाहतीत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला आग लागली. घटनेच्या वेळी बँकेत माेजकेच ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : स्थानिक वीज वसाहतीत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला आग लागली. घटनेच्या वेळी बँकेत माेजकेच अधिकारी उपस्थित असल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना मंगळवारी (दि. ९) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली असून, एसीमधील शाॅर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काेराडी येथील वीज वसाहतीमध्ये भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. मंगळवारी सायंकाळी बँक कर्मचारी घरी निघून गेले हाेते. शिवाय, व्यवहार बंद झाल्याने खातेदारही बँकेत नव्हते. काही अधिकारी त्यांच्या केबिनमध्ये काम करीत हाेते. त्यातच परिसरातील नागरिकांना बँकेच्या इमारतीतून धूर निघत असल्याचे आढळून आले. त्यांनी बँक अधिकाऱ्यांसाेबत काेराडी वीज केंद्राच्या अग्निशमन दलाला सूचना दिली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच घटनास्थळ गाठून पाहणी केली. आत धूर दाटला असल्याचे लक्षात येताच त्यांनी खिडक्यांची तावदाने व दारे ताेडून धूर आधी बाहेर काढला. त्यानंतर आतील आग नियंत्रणात आणली. इमारतीतील एसीमध्ये शाॅर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली असून, हा प्राथमिक अंदाज आल्याचे त्यांनी सांगितले. या बँक शाखा इमारतीचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करण्याची सूचना संबंधितांना त्यांनी स्पष्ट केले. या आगीत आतील कागदपत्रे सुरक्षित असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.