निसर्ग पर्यटन योजनांसाठी राज्याला मिळाले ३०.६० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 12:11 AM2021-04-02T00:11:08+5:302021-04-02T00:12:49+5:30
Echo tourism schemes इको टुरिझम योजनेअंतर्गत निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्याला ३० कोटी ५९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. विदर्भासह चिंकारा संरक्षण व जैवविविधता वनोद्यान, पाचगाव पर्वती येथील तळजाई वनोद्यान, कन्हेरी येथे वन्यप्राणी वन पर्यटनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इको टुरिझम योजनेअंतर्गत निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्याला ३० कोटी ५९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. विदर्भासह चिंकारा संरक्षण व जैवविविधता वनोद्यान, पाचगाव पर्वती येथील तळजाई वनोद्यान, कन्हेरी येथे वन्यप्राणी वन पर्यटनासाठीनिधीची तरतूद करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला १८ कोटी ३५ लाखांचा भरीव निधी मिळाला असून, यात टिपेश्वर, महालक्ष्मी संस्थान, पोहरादेवी, धामणगाव देव व यवतमाळच्या जैवविविधता वन उद्यानांचा समावेश आहे. ३१ मार्च रोजी हा निधी वितरितही करण्यात आला असून, निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांकडे निधी प्राप्त झाला आहे. आर्थिक वर्षाच्या अगदी शेवटच्या दिवशी निधीची तरतूद झाल्याने पर्यटन विकासाला या वर्षात चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. येथील नैसर्गिक स्थळांचा विकास झाल्यास स्थानिक बेरोजगारांनाही रोजगार मिळून पर्यटनाच्या माध्यमातून शासनास महसूलही प्राप्त होणार आहे.
पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याचा विकास आराखड्यासाठी नऊ कोटी ४३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विदर्भातील एकमेव महालक्ष्मी मंदिर म्हणून ओळखले जाणारे दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी संस्थानअंतर्गत वन पर्यटनास चालना देण्यासाठी ३२ लाख रुपये, श्री संत मुंगसाची महाराज समाधीस्थळ धामणगाव (देव)च्या विकासासाठी २४ लाख, नेर येथील अरोमा पार्क वन उद्यानासाठी ६४ लाख, यवतमाळ तालुक्यातील वडगाव रोडस्थित जांब येथील जैवविविधता वन उद्यानासाठी ५६ लाख आणि वाशिम जिल्ह्यात असलेल्या पोहरादेवी येथील बायोलॉजिकल पार्कच्या विकासासाठी सात कोटी १५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला.
राज्यातील अन्य भागातही निसर्ग पर्यटनास चालना
राज्य शासनाने राज्यातील निसर्ग पर्यटनास चालना दिली आहे. त्यासाठी मंजूर निधीतून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील चिंकारा संरक्षण व जैवविविधता वनउद्यानासाठी दोन कोटी ७६ लाख रुपये, पाचगाव पर्वती येथील तळजाई वनउद्यानासाठी चार कोटी १८ लाख रुपये, कन्हेरी येथे वन्यप्राणी वन पर्यटनासाठी तीन कोटी ४९ लाख रुपये तर वन्यप्राणी अधिवास विकास परिसरासाठी एक कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.