प्रवाशांची विमानतळावरच तपासणी, राज्य सरकार सतर्क; मास्कला वाढली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:34 AM2020-03-04T04:34:57+5:302020-03-04T04:35:04+5:30
देशातून विमानाने आलेल्या प्रवाशांची तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच करून आवश्यकतेनुसार त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे.
नागपूर/मुंबई : कोरोनाबाधित देशातून विमानाने आलेल्या प्रवाशांची तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच करून आवश्यकतेनुसार त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. नागपुरात कोरोनाचे तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे ‘एन-९५’ मास्कची मागणी वाढली आहे. पूर्वी नागपुरात जिथे दिवसभरात २०० ते ५०० मास्कची विक्री व्हायची ती संख्या आता तीन हजाराच्या घरात गेली आहे. एका मास्कची किंमत १५० रुपये आहे. नागपूर विभागांतर्गत आरोग्य विभागाकडून वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर येथे प्रत्येकी एक आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.
मीरारोडची सोनाली भारतात परतली
जपानजवळील एका जहाजावर अडकलेल्या मुंबईतील मीरा रोडच्या सोनाली ठक्करसह १८ भारतीयांना दिल्ली येथे तीन दिवसांपूर्वी आणण्यात आले. त्यांना एका रु ग्णालयात ठेवले असून १४ दिवसांनंतर तिला घरी पाठवले जाणार असल्याची माहिती सोनालीच्या वडिलांनी दिली. चीनच्या एका शिपिंग कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणारी सोनाली जहाजाने चीन येथून जपानला जात असताना, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जपानने जहाज समुद्रातच रोखले. सोनाली १८ दिवस त्या जहाजावर एका केबिनमध्ये बंदिस्त होती. मदतीसाठी तिने कुटुंबियांशी संपर्क साधला होता.
राज्य शासनाची हेल्पलाईन
राज्य शसनाच्या आरोग्य विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे. यात राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ व टोल फ्री क्रमांक १०४ या क्रमाकांवर संपर्क केल्यास कोणत्या रुग्णालयात विलगीकरण कक्ष आहेत,
पर्यटन केले असल्यास कोणती काळजी घ्यावी, शंकांचे निरसन
तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात
येत आहे.
>१४९ प्रवासी करोना निगेटिव्ह
चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द कोरिया,जपान, नेपाळ,इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया,इराण आणि इटली या १२ देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत ४०१ प्रवासी आले आहेत. विलगीकरण कक्षात १५२ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर ३ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या १५२ प्रवाशांपैकी १४६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.