राज्य सरकारचे पॅकेज केवळ दिखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:41+5:302021-04-15T04:07:41+5:30
नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या पॅकेजवर टीका केली. फडणवीस ...
नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या पॅकेजवर टीका केली. फडणवीस यांचा आरोप आहे की, या पॅकेजमध्ये ३३०० कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतूद आहे, नवीन काही नाही.
नागपुरात पोहचल्यानंतर फडणवीस पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्री रुग्णालयातील बेड, व्हेंटिलेटर आदी सुविधा वाढविण्यासंदर्भात माहिती देतील. मात्र तसे झाले नाही. उलट त्यांच्याद्वारे घोषित केलेल्या पॅकेजमध्ये अनेक घटकांवर त्यांनी लक्ष दिले नाही. यात शेतकरी, छोटे व्यापारी, सलूनचा व्यवसाय करणारे यांच्यासाठी काहीच नाही. स्वस्त धान्य दुकानांना केंद्र सरकारकडून धान्याचा पुरवठा होतो. परंतु राज्यात १ कोटी लोक असे आहेत की जे २०११ मध्ये केलेल्या चुकीच्या सर्व्हेमुळे अन्न सुरक्षा कायद्यात बसू शकले नाहीत. या लोकांसाठी कुठलीही तरतूद केली नाही. नोंदणीकृत स्ट्रीट व्हेंडरला देण्यात येणारा लाभ केवळ मुंबई आणि ठाण्यातील व्हेंडरलाच मिळणार आहे. कारण येथील व्हेंडरच नोंदणीकृत आहे.
आम्हाला अपेक्षा होती की बेड, व्हेंटिलेटर वाढविण्यात येतील. या पॅकेजची अनेक घटकांना मदत मिळणार नाही. आदिवासींना देण्यात येणार असलेल्या खावटी अनुदानाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की राज्य सरकारने गेल्यावर्षी ४ हजार कोटींची तरतूद केली होती. पण २००० कोटी रुपये देऊन सरकारने आदिवासी समाजाची दिशाभूल केली आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना घरून विकण्याची परवानगी दिली आहे. परंतु त्याचा लाभ विक्रेत्यांना होणार नाही. त्यांच्याकडे पॅकिंगची कुठलीही सुविधा नाही. अशात लॉकडाऊन असल्याने त्यांच्याकडे येणार तरी कोण?
- नागपूरची स्थिती चिंताजनक
फडणवीस म्हणाले की, नागपूरची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. नागपूरला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. ते म्हणाले, मुंबई व पुणे ही राज्यातील महत्त्वाची शहरे आहे. परंतु या दोन शहराच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. सरकारला इतर शहरांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.