वसंतराव नाईक ऑडीटोरियमवर सरकारचे आज उत्तर; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले उपस्थित केला मुद्दा

By निशांत वानखेडे | Published: December 13, 2023 05:41 PM2023-12-13T17:41:47+5:302023-12-13T17:42:12+5:30

आता सरकारकडून या प्रश्नावर गुरुवारी निवेदन सादर केले जाणार आहे.

state government reply today on Vasantrao Naik Auditorium; Prithviraj Chavan, Nana Patole raised the issue | वसंतराव नाईक ऑडीटोरियमवर सरकारचे आज उत्तर; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले उपस्थित केला मुद्दा

वसंतराव नाईक ऑडीटोरियमवर सरकारचे आज उत्तर; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले उपस्थित केला मुद्दा

नागपूर : हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने नागपुरात अत्याधुनिक सभागृह निर्मितीचा प्रकल्प १२ वर्षापासून रखडला आहे. या दिरंगाईबाबत 'वसंतराव नाईक ऑडीटोरियमचा वनवास संपेना' या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित हाेताच विराेधी पक्षनेत्यांनी विधानसभेत त्यावर प्रश्न उपस्थित केला. आता सरकारकडून या प्रश्नावर गुरुवारी निवेदन सादर केले जाणार आहे.

वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सन २०१२ मध्ये नागपुरात अत्याधुनिक 'वसंतराव नाईक ऑडीटोरियम' उभारण्याचा निर्णय तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारने घेतला होता. जागेच्या कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळत राहिला. पुढे नागपूर विद्यापीठाच्या मौजा पांढराबोडी येथिल सात एकर जागा निश्चित करण्यात आली. याप्रकरणी नासुप्रला २० कोटी रुपये वर्ग करण्यात आले. प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला पण पुढे काहीच झाले नाही. यावर लोकमतने बुधवारी वृत्त प्रकाशित झाले. 

याची दखल घेत विधानसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वसंतराव नाईक ऑडीटोरियमचा प्रश्न उपस्थित केला. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कामाचे अहवाल सादर करण्याची मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. मुंबई येथील वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या जागा आणि नागपूर येथील वसंतराव नाईक ऑडीटोरियम बाबत शासनाने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची सुचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी ऑडीटोरियमच्या कामाबाबत अहवाल सादर करण्याची मागणी केली. शासन गुरूवारी यावर निवेदन सादर करणार आहे. त्यानंतर वसंतराव नाईक ऑडिटोरियमचा वनवास संपणार कि अजून पुढे चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करणारे वसंतराव नाईक जन्मशताब्दी कमिटीचे सदस्य माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार इंद्रनील नाईक, राजेश राठोड आणि एकनाथ पवार यांनी प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल लोकमतचे आभार मानले.

Web Title: state government reply today on Vasantrao Naik Auditorium; Prithviraj Chavan, Nana Patole raised the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.