कर्मचारी आंदोलनावर राज्य शासनाने तोडगा काढावा : अभाविपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:58 PM2020-10-01T20:58:54+5:302020-10-01T20:59:56+5:30
कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुद्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून गुरुवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुद्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून गुरुवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कर्मचारी आंदोलनावर राज्य शासनाने त्वरित तोडगा काढावा व लवकरात लवकर परीक्षांचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा होणे अत्यावश्यक आहे. या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी याच कालावधीत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शासनाची अनास्था जबाबदार आहे. कर्मचारी हे परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहेत व या आंदोलनामुळे परीक्षा आणि पुढील प्रवेशप्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो. परीक्षेचा ताण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली असल्याची माहिती महानगर कार्यालय मंत्री संकेत जावळकर यांनी दिली.