सामाजिक न्यायासाठी राज्य शासन तत्पर
By Admin | Published: June 27, 2017 01:57 AM2017-06-27T01:57:19+5:302017-06-27T01:57:19+5:30
राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे : बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप, आंतरजातीय विवाह केलेल्यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणून सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने नवीन संकल्पना व योजना आणल्या आहेत.
या योजनांचा लाभ महिला, अपंग, मागासवर्गीय, वृद्ध, निराधार व्यक्ती, तसेच वंचित घटकातील व्यक्तींना मिळत आहे. सामाजिक समस्यांचे निर्मूलन करून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी राज्य शासन तत्पर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, जिल्हास्तरीय सामाजिक विकास शक्तीप्रदत्त समिती, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग व सहायक आयुक्त समाजकल्याण तसेच जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी आदींच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅडिटोरियम येथे आयोजित सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ. मिलिंद माने, जि.प.चे उपाध्यक्ष शरद डोणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, सभापती उकेश चव्हाण, दीपक गेडाम, संतोष आव्हाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त आर.डी. आत्राम, जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
बेरोजगारांना रोजगार मिळावा. यासाठी कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. युवकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन स्वत:मध्ये कौशल्य विकसित करावे, असेही बावनकुळे म्हणाले.
याप्रसंगी मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील इयत्ता १० वी व १२ वी मधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराच्या धनादेशाचे वाटप, बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप, रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे कर्ज धनादेशाचे वाटप करण्यात आले.
तसेच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त विजय वाकुलकर यांनी तर आभार माधव झोड यांनी मानले.