नवोदित शास्त्रीय गायकांच्या स्वरांना राज्य सरकारचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:07 AM2019-07-09T11:07:10+5:302019-07-09T11:08:58+5:30
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने युवा शिष्यवृत्ती योजना आणली आहे. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या युवकांना दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांच्या गळ्यात जादू असते. स्वर्गीय स्वरांनी मोहित करण्याची शक्ती त्यांच्या गायनात असते. अनेकांना वादनाचे शास्त्रीय अंग असते. त्यांच्या बोटांमध्ये असलेली नजाकत आपोआपच ताल धरायला लावते. जगापुढे येण्याची चमक असणारे काही कलावंत मागे पडतात. अशा नवोदित युवा कलावंतांसाठी सुवार्ता आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने युवा शिष्यवृत्ती योजना आणली आहे.
या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या युवकांना दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी असेल.
या शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या अटींसह अर्जाचा नमुना www.maharastra.gov.in आणि www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शास्त्रीय संगीतामधील निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग मुंबई-३२ या पत्त्यावर पाठविता येणार आहे. हे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.