राज्यात साथ साथ, जिल्ह्यात मात्र काटछाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:09 AM2021-08-19T04:09:18+5:302021-08-19T04:09:18+5:30
नागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नागपूर शहर जिल्ह्यात मात्र ...
नागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नागपूर शहर जिल्ह्यात मात्र काँग्रेस व शिवसेनेतच नेहमीच काटछाट सुरू असल्याचे दिसून येते. महापालिकेत व जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या कुठल्याही प्रस्तावाला शिवसेनेने सहज पाठिंबा दिलेला नाही. उलट काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते पळविणे सुरू केले आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक लागली असता शिवसेनेने स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरविले होते. पुढे निवडणूक स्थगित झाल्याने महाविकास आघाडीतील संघर्ष टळला. तीच परिस्थिती नागपूर शहरात आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत युती होण्याची चिन्हे नाहीत. शहर काँग्रेसने तर शिवसेनेशी युती करू नका, अशी उघड भूमिका घेतली आहे.
नागपूर महापालिका
- महापालिकेत १०८ नगरसेवकांसह भाजपची एकछत्री सत्ता आहे. काँग्रेसचे २९, राष्ट्रवादी एक, तर शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक आहेत. येथे महाविकास आघाडी विरोधी पक्षात असली तरी एकसंध नाही.
येथे विरोधी पक्षात असल्यामुळे महाविकास आघाडीची नोंदणीच झालेली नाही.
- महापालिकेत शिवसेनेने वेळोवेळी कचरा घोटाळा उजेडात आणला. पण, हा मुद्दा उचलून धरण्यासाठी काँग्रेस सेनेच्या पाठीशी उभी राहिली नाही.
- तर कोरोना लस खरेदीच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केला असताना शिवसेनेने मौन साधले होते.
महापालिकेतील संख्याबळ
काँग्रेस : २९
राष्ट्रवादी : ०१
शिवसेना : ०२
जिल्हा परिषद
-काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना बाहेरून सत्तेत सहभागी झाली आहे. शिवसेनेचा एकच सदस्य असल्यामुळे कुठलेही सभापतिपद किंवा महत्त्वाच्या समितीवर स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेना नाराज आहे.
- सामूहिक विकासकामांच्या मुद्द्यावर नुकतेच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली.
- कचरा गाडी खरेदी प्रकरण, १५व्या वित्त आयोग निधीच्या नियोजनाच्या विषयात शिवसेनेने सत्ताधारी काँग्रेसविरोधात भूमिका घेतली आहे.
जिल्हा परिषदेतील संख्याबळ
काँग्रेस : २३
राष्ट्रवादी : ०६
शिवसेना : ०१
भाजप : ११
-------------------
( )
- शहरात प्रत्येक वॉर्डात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी अवास्तव जागांची मागणी करते. त्यांना जागा सोडल्या तर काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. काँग्रेसची स्वबळावर लढण्याची भूमिका कायम आहे.
आमदार विकास ठाकरे,
शहर अध्यक्ष, काँग्रेस
--------------
( )
महापालिकेत काँग्रेसशी समन्वय साधण्याचा शिवसेनेकडून नेहमीच प्रयत्न होतो. राज्याप्रमाणे महापालिकेतही महाविकास आघाडी व्हावी, अशी इच्छा आहे. पण, काँग्रेसनेही शिवसेनेला कमी लेखणे सोडून सकारात्मक भूमिका घेणे अपेक्षित आहे.
- प्रमोद मानमोडे
महानगरप्रमुख, शिवसेना