ही तर अप्रत्यक्ष युद्धाची स्थिती; संघाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:34 PM2019-02-19T12:34:07+5:302019-02-19T12:34:35+5:30
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे. ही अप्रत्यक्ष युद्धाचीच स्थिती असून, देशवासीयांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकत्रित आले पाहिजे, असे मत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.
आपल्या जवानांच्या बलिदानानंतर संपूर्ण देशात अस्वस्थता आहे. आपण शांतिपूर्वक वातावरणात राहिलो पाहिजे, यासाठी देशातील प्रत्येक भागात दररोज जवान शहीद होत आहेत.
मातृभूमीच्या सुरक्षेसाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या वेदनेत आम्ही सर्व त्यांच्यासमवेत आहोत. त्यांनी देशासाठी जीवन अर्पण केले आहे. त्यामुळे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी व मुलांचे शिक्षण व देखभालीची जबाबदारी देशवासीयांची आहे. भारत सरकारकडून सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ‘भारत के वीर’ या नावाने संकेतस्थळ व ‘अॅप’ विकसित करण्यात आले व या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत व्यक्तिगतपणे तसेच एकाहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत पोहोचविणे शक्य आहे. संघ स्वयंसेवकांनी अशा प्रसंगात नेहमी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशास्थितीत संघ स्वयंसेवकांसह सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य जाणून मदत केली पाहिजे. तसेच या आव्हानात्मक स्थितीत सर्वांनी एकजूटता, धैर्य व संयम दाखवावे, असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी केले.