राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव १२ जानेवारीपासून
By आनंद डेकाटे | Published: December 29, 2023 06:59 PM2023-12-29T18:59:25+5:302023-12-29T18:59:34+5:30
२२ विद्यापीठांचे सुमारे २४०० विद्यार्थी सहभागी होणार : कुलगुरूंनी घेतला आढावा
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव १२ ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान होणार आहे. विद्यापीठ क्रीडा संकुल परिसरात आयोजित या क्रीडा महोत्सवात महाराष्ट्रातील २२ विद्यापीठांचे सुमारे २४०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्स, बॅटमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आदी खेळांचे मुले व मुलींच्या संघांचे सामने होतील.
महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानाखाली होणार आहे. राज्य क्रीडा महोत्सव जवळ येत असल्याने विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. शुक्रवारी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी स्पर्धा नियोजित असलेल्या परिसरातील विविध कामांची पाहणी केली. स्पर्धा परिसरात नव्याने पार्किंग व्यवस्था तयार करणे. नवीन कॅफेट एरिया उभारणे.
परिसराची रंगरंगोटी करणे. कायमस्वरूपी नवीन ३ प्रवेशद्वाराची निर्मिती करणे. परिसर सौंदर्यकरण त्याचप्रमाणे बास्केटबॉल कोर्टची रंगरंगोटी करणे आदी महत्त्वपूर्ण सूचना कुलगुरूंनी यावेळी संबंधित विभागाला दिल्या. मैदानी खेळ परिसरात विविध सुविधा निर्माण करीत या भागात विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या. स्पर्धा परिसरात सुसज्ज असा वैद्यकीय कक्ष उभारण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, विद्यापीठ अभियंता नितीन विश्वकार, उद्यान अधीक्षक प्रवीण गोतमारे, उपअभियंता महेंद्र पाटील, डॉ. आदित्य सोनी, डॉ. नितीन जांगीटवार, डॉ. मनोज आंबटकर, राजेंद्र बालपांडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.