मेडिकलमध्ये राज्यस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:18 PM2019-02-19T22:18:52+5:302019-02-19T22:21:38+5:30

देशातील विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यास्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) तर अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीनस्तरावर ‘व्हीआरडीएल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) चमूने सोमवारी नागपूरच्या मेडिकलची पाहणी केली. पुढील आर्थिक वर्षात या प्रयोगशाळेसाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

State-level Biological Research and Diagnostic Laboratory | मेडिकलमध्ये राज्यस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा

मेडिकलमध्ये राज्यस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा

Next
ठळक मुद्दे‘आयसीएमआर’कडून पाहणी : अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथेही महाविद्यालयीनस्तरावर प्रयोगशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यास्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) तर अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीनस्तरावर ‘व्हीआरडीएल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) चमूने सोमवारी नागपूरच्या मेडिकलची पाहणी केली. पुढील आर्थिक वर्षात या प्रयोगशाळेसाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
चिकनगुनिया, डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू, मेंदूज्वर, इन्फ्लूएन्झा, झिका यासारखे विषाणूजन्य आजार आता नवीन राहिले नाही. त्या-त्या ऋतूमध्ये ते आढळून येतात. गेल्या वर्षी विदर्भात स्क्रब टायफस व डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते तर आता स्वाईन फ्लूची दहशत सुरू आहे. पूर्वी यातील बहुसंख्य विषाणूजन्य संशयितांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले जात होते. परंतु नमुने पाठविण्यापासून ते त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत चार-पाच दिवसांचा कालावधी लागायचा. यावर खर्चही मोठा व्हायचा. दरम्यान, २०१३-१४ मध्ये दोन प्रादेशिक, चार राज्यस्तरीय व देशातील आठ विषाणू प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली. यात महाराष्ट्राच्या वाट्याला नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ही विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा आली. परंतु निधी, आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध न झाल्याने काही चाचण्यांपुरतीच ही प्रयोगशाळा मर्यादित राहिली. गेल्या वर्षी पुन्हा केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळेचे जाळे निर्माण करण्याची योजना आखली. यानुसार महाराष्ट्रात ‘विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा’स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) राज्यस्तरीय प्रयोगशाळा तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयस्तरीय प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे. यासाठी सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सोमवारी ‘आयसीएमआर’चे उपमहासंचालक डॉ. अशोककुमार बग्गा व डॉ. ओम प्रकाश यांच्या द्विसदस्यीय चमूने मेडिकलची पाहणी केली; सोबतच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांची भेट घेतली. राज्यात सुरू होणाऱ्या या प्रयोगशाळेचा खर्च केंद्र शासन उचालणार असून, राज्याला केवळ संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात जागा उपलब्ध करून द्यायची आहे.
असा आहे प्रयोगशाळेचा उद्देश
साथ पसरविणाऱ्या विषाणूंचा शोध घेणे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, आजार निदान संच तयार करणे, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच विषाणूंबाबत संशोधन आणि अभ्यास करणे, हा या प्रयोगशाळा उभारण्यामागचा उद्देश आहे.

Web Title: State-level Biological Research and Diagnostic Laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.