राज्यपातळीवर ‘नार्को फ्लशआऊट’, १० महिन्यांत ११,७०० आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 08:00 AM2022-12-30T08:00:00+5:302022-12-30T08:00:07+5:30

Nagpur News राज्यपातळीवर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या माध्यमातून २०२२ मध्ये १० महिन्यांत ११ हजारांहून अधिक आरोपींना अटक झाली असून, जवळपास तेवढेच गुन्हे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.

State level 'narco flushout', 11,700 accused arrested in 10 months | राज्यपातळीवर ‘नार्को फ्लशआऊट’, १० महिन्यांत ११,७०० आरोपींना अटक

राज्यपातळीवर ‘नार्को फ्लशआऊट’, १० महिन्यांत ११,७०० आरोपींना अटक

Next
ठळक मुद्देअंमली पदार्थ सेवन-तस्करीचे अकरा हजार गुन्हे दाखल

योगेश पांडे

नागपूर : मागील काही महिन्यांत राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचे काही मोठे गुन्हे उघडकीस आले. अंमली पदार्थांच्या जाळ्याची बाब राज्य शासनाने गंभीरतेने घेतली असून, राज्यपातळीवर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या माध्यमातून नियंत्रणावर भर देण्यात येत आहे. २०२२ मध्ये १० महिन्यांत ११ हजारांहून अधिक आरोपींना अटक झाली असून, जवळपास तेवढेच गुन्हे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.

महादेव जानकर व इतर सदस्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत ९ हजार ५३० गुन्हे दाखल करण्यात आले, तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या ९ हजार ७०० आरोपींना अटक करण्यात आली, तर अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व त्यांची तस्करी करण्याबाबतच्या प्रकरणांत १ हजार ५३० गुन्हे दाखल झाले व त्यात २ हजार १३ आरोपींना अटक करण्यात आली, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

जिल्हा पातळीवर नार्को समन्वय समिती

राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीस व प्रसारास आळा घालण्यासाठी सर्व पोलिस आयुक्तालयाअंतर्गत स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एटीएसच्या अपर पोलिस महासंचालकांकडे समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय राज्यात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर नार्को समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांकडून वेळोवेळी अंमली पदार्थांच्या गुन्हे व तस्करीबाबत आढावा घेण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दोनच महिन्यांत चार हजार किलोंचे अंमली पदार्थ जप्त

एनसीबीने जुलै महिन्यात केलेल्या कारवाईत १९० किलो गांजा जप्त केला होता, तर सप्टेंबरमध्ये ३.२ किलो कोकेन जप्त केले होते. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोनच महिन्यांत एनसीने जवळपास ४ हजार १०४ किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मीरा-भाईंदरमध्येच १० टक्के गुन्हे

राज्यातील विविध भागांमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट सुरू असल्याची बाब समोर आली होती. एकट्या मीरा भाईंदर, वसई-विरार या भागात राज्यातील १० टक्के गुन्हे झाले. अंमली पदार्थांचे सेवन व तस्करीबाबत १ हजार ९६ गुन्हे दाखल झाले, तर १ हजार ३७७ आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: State level 'narco flushout', 11,700 accused arrested in 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.