मेयोतील अद्ययावत शवचिकित्सा संकुल हे देशातील पहिले असावे - नितीन गडकरी
By सुमेध वाघमार | Published: February 24, 2024 09:10 PM2024-02-24T21:10:51+5:302024-02-24T21:11:20+5:30
या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे उपस्थित होते.
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) न्यायवैद्यकशास्त्र विभागातील अद्ययावत असलेले शवचिकित्सा संकुल हे राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिले असावे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी या संकुलाच्या लोकार्पणप्रसंगी काढले. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे उपस्थित होते.
न्यायवैद्यकशास्त्र विषयात एमडी सुरू करणारा पहिला विभाग -
डॉ. व्यवहारे यांनी सांगितले, मेयोतील न्यायवैद्यकशास्त्र विभाग हा महाराष्टÑातील अग्रणी विभाग असून न्यायवैद्यकशास्त्र विषयात एमडी सुरू करणारा हा पहिला विभाग आहे. २०१७ मध्ये मेयोच्या या न्यायवैद्यकशास्त्र विभागाची दुरावस्था झाली होती. झाडाखाली शवचिकित्सा व्हायचे. एकही शीतगृह कार्यरत नव्हते. परंतु त्यानंतर विभागाचे अद्ययावतीकरण व नुतनीकरण करण्यात आले.
पहिल्यांदाच न्यायवैद्यक विभागाचे ‘डिजीटललायजेशन’-
आजही बहुसंख्य वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक कागदपत्रे हस्तलिखीत देण्यात येतात. मात्र, मेयोच्या न्यायवैद्यक विभागाने २०१८ मध्येच ‘इआरपी’ न्यायवैद्यक संगणक प्रणाली सुरू करून ‘डिजीटललायजेशन’ करून घेतले. यामुळे राज्यच नाही तर देशात ‘इआरपी’संगणक प्रणाली सुरू करणारा हा विभाग पहिला ठरल्याचे डॉ. व्यवहारे म्हणाले.
-२५० विद्यार्थी क्षमतेचे व्याख्यान सभागृह
२०१९मध्ये विद्यार्थ्यांसाठी २५० क्षमतेचे वातानुकूलित व्याख्यान सभागृह बांधण्यात आले. ज्यामुळे महाविद्यालयाला १५० विद्यार्थी क्षमतेसाठी मान्यता मिळाली. मृतकाच्या नातेवाईकांकरिता प्रतिक्षालय, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळाचे शेड, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आले.
-सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन शक्य
शवचिकित्सा संकुलात एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. जे उच्च दर्जाची रोषणाई प्रदान करतात. ज्यामुळे सूर्यास्तानंतरही शवचिकित्सा तपासणी करणे शक्य होते. या शिवाय एक १४० चौरस मीटर चा शवचिकित्सा हॉल, ज्यात आधुनिक शवचिकित्सा यंत्रे आणि उपकरणे उपलब्ध आहे. एकाच वेळी ४ मृतदेहांची शवचिकित्सा करण्याची सोय आहे.
-थेट चित्रीकरणातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
शवचिकित्सा कक्षामध्ये, दोन शवचिकित्सा टेबलवर प्रस्थापित कॅमेरे असलेली विशेष व्हिडिओ चित्रीकरण प्रणाली आहे. ज्यामुळे विद्यार्थी, डॉक्टरांना प्रशिक्षण देता येते. वेळेप्रसंगी पोलीस कर्मचाºयांना शवविच्छेदन दाखविता येते. अश्या प्रकारच्या व्हिडिओ कॅप्चरिंग सिस्टीमची सुविधा देशात इतर कोठेही नसल्याचे डॉ. व्यवहारे म्हणाले.