रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक पार्सल टनेल स्कॅनर; धोक्याच्या साहित्याची वाहतूक होणार ब्रेक
By नरेश डोंगरे | Published: April 4, 2024 08:04 PM2024-04-04T20:04:45+5:302024-04-04T20:05:00+5:30
धोक्याच्या साहित्याची वाहतूक होणार ब्रेक : गाड्यांमध्ये आग आणि स्फोटासारख्या घटना टाळण्यास उपयुक्त
नागपूर : धोकादायक चिजवस्तू आणि प्रतिबंधित साहित्याची रेल्वेतून वाहतूक करवून घेण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नागपूररेल्वे स्थानकावरच्या पार्सल कार्यालयात पार्सल टनेल स्कॅनर बसविण्यात आले आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये होणाऱ्या आग आणि स्फोटासारख्या घटना टाळण्यास मदत होणार आहे. प्रतिबंध असूनही धोकादायक साहित्याची, प्रतिबंधित चिजवस्तूंची काही जण बेमालूमपणे वाहतूक करवून घेतात.
पार्सलमध्ये बाह्यदर्शनी दुसरे आणि आतमध्ये धोकादायक किंवा प्रतिबंधित साहित्य लपवून ते पार्सल कार्यालयात जमा करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत त्याची वाहतूक करवून घेतली जाते. एकदा रेल्वेगाडीत पार्सल लोड झाले की जेथे कुठे ते उरवून घ्यायचे आहे, तेथपर्यंत या पार्सलला मध्ये आठकाठी येत नाही. मात्र, धोकादायक वस्तू अथवा साहित्यामुळे रेल्वेगाड्यांमध्ये आग लागण्याचे आणि स्फोट होण्याचे प्रकार घडतात. त्यातून नाहक निर्दोष प्रवाशांच्या जानमालाला धोका निर्माण होतो.
मध्य भारताचे प्रमूख आणि अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून नागपूर स्थानकाची ओळख आहे. येथून रोज वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचे, मालाचे लोडिंग होते. ते लक्षात घेऊन या रेल्वे स्थानकावरची पार्सल स्कॅनिंगची व्यवस्था भक्कम करण्याचे अनेक दिवसांपासूनचे प्रयत्न होते. या पार्श्वभूमीवर आता रेल्वे स्थानकावरच्या पार्सल कार्यालयात पार्सल टनेल स्कॅनर बसविण्यात आले आहे. या स्कॅनरमध्ये
प्रतिबंधित आणि धोकादायक वस्तू तात्काळ शोधण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या स्कॅनरमधून जाणाऱ्या वस्तू अथवा साहित्यात काही गडबड असेल तर स्कॅनर लगेच संभाव्य धोक्यांचा ईशारा देते. त्यामुळे तातडीने उपाय करून प्रवाशांच्या जानमालाचे संरक्षण करण्यास मदत होते.
पार्सल लोडिंगची प्रक्रिया २४ तास असल्यामुळे या स्कॅनरसाठी २४ तास स्टँडबाय पॉवर सप्लाय, २४ तास मनुष्यबळ आणि सुरुवातीला स्कॅन होऊ न शकलेल्या किंवा ओव्हर डायमेंशनल कन्साईनमेंट्स (ओडीसी) असलेल्या पॅकेजसाठी हँडहेल्ड स्कॅनरचीही सुविधा पार्सल कार्यालयात आहे.
-------------
स्कॅनिंग झाल्यानंतर स्टिकरही आवश्यक
हे स्कॅनर कार्यान्वित होताच रेल्वे प्रशासनाने एक आदेश काढला. त्यानुसार, आता पार्सल कार्यालयातून बुक केलेल्या मालासह सर्व नॉन-लीज्ड पार्सलला रेल्वे गाडीत लोड करण्यापूर्वी स्कॅनिंग अनिवार्य करण्यात आले आहे. पॅकेजचे अचूक स्कॅनिंग झाल्यानंतर त्यावर स्टिकर लावले जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नसल्याचा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे.
------------
अजनी, बैतुल आणि बल्लारशाह स्थानकांवरही लवकरच
नागपूरच्या मुख्य स्थानकावर हे स्कॅनर लावण्यात आले आहे. आता पुढच्या काही दिवसांत अजनी, बैतुल आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांवरच्या पार्सल कार्यालयातही अशाच प्रकारचे स्कॅनर बसवण्याची रेल्वे प्रशासनाची योजना आहे.