...तर केंद्राने स्वीकारलेली ‘पाळेकर शेती’ राज्यातही राबवू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 05:48 AM2019-07-15T05:48:38+5:302019-07-15T05:50:09+5:30
सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असे नाव जाहीर होणार असून यावर्षी पहिल्या टप्प्यात देशातील ६०० विकास खंडात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती खुद्द पाळेकर यांनी दिली.
नागपूर : ‘झिरो बजेट’ला लवकरच सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असे नाव जाहीर होणार असून यावर्षी पहिल्या टप्प्यात देशातील ६०० विकास खंडात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती खुद्द पाळेकर यांनी दिली. महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास राज्यातही हा प्रयोग राबविण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
अर्थमंत्र्यांनी घोषित केलेली झिरो बजेट शेती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून नैसर्गिक शेतीचाच प्रयोग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजे ६०० विकास खंडावर हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यंत्रणा उभी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
नुकतेच कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पाळेकरांना चर्चेसाठी बोलाविले होते. परंतु हे तंत्र केवळ कृषी खात्याशी संबंधित नाही तर पर्यावरण, सिंचनासह राज्याच्या इतरही खात्याला लाभदायक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सर्व खात्यांची एकत्रित बैठक घेतल्यास आपण चर्चा करू आणि हा प्रयोग राज्यात राबवू, अशी हमी कृषिमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पाळेकर यांनी केले आहे.