घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्याने कायदा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 08:23 PM2019-12-17T20:23:11+5:302019-12-17T20:26:17+5:30
पारदर्शकता रहावी व घोडेबाजार थांबावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा करावा, अशी सूचना आम्ही करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेची निवडणूक किंवा विश्वासदर्शक ठरावासंबंधीच्या मतदानाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता असते. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत गुप्त पद्धतीने मतदान घेऊ नये, असे आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रात विश्वासदर्शक ठरावादरम्यान महाविकास आघाडीचे सरकार जिंकू शकले. अशा प्रकारच्या मतदानादरम्यान पारदर्शकता रहावी व घोडेबाजार थांबावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा करावा, अशी सूचना आम्ही करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली. अशोक चव्हाण यांच्यासह राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर वरिष्ठ संपादकांशी संवाद साधला.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच राज्यात घोडेबाजार होऊ शकला नाही. सर्वोच्च न्यायालयामुळे विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान पारदर्शकता आली. सरकार कुणाचेही असो, विधानसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदान हे गुप्त पद्धतीने घेऊ नये. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला वाव मिळतो. त्यामुळेच खुल्या पद्धतीने मतदान घेतले जावे, असेही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.
आघाडी सरकारच्या काळात कृषिमंत्री असताना शेततळे योजना ही विदर्भासाठी तयार करण्यात आली होती. पण त्याची व्यापक पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही. त्याचा फायदा इतर विभागांनाच जास्त झाला, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या व त्यांना नफा मिळावा यासाठी शेतीतील विविध प्रयोग राबविण्याची आवश्यकता आहे. सोबतच योग्य दिशेने जागृतीदेखील झाली पाहिजे. नागपुरात एखाद्याला पुष्पगुच्छ देत असताना त्यातील फुले बाहेरून आणावी लागत असतील तर ते विदर्भाच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. हे एक उदाहरण झाले. पण लहान लहान गोष्टींतून जास्त रोजगार कसे वाढतील याचे नियोजन झाले पाहिजे. असे झाले तरच विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. आमचे सरकार त्यादृष्टीने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपुरातील अधिवेशनात आमदारांची मैत्री
नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे अनेक प्रकारे फायद्याचे ठरते. येथे राजकीय चर्चा, विदर्भाचे मुद्यांवर मंथन तर होतेच. शिवाय आमदारांनादेखील बरेच काही शिकायला मिळते. या अधिवेशनात आमदार विविध मुद्यांवर एकमेकांशी सखोल चर्चा करु शकतात. यामुळे त्यांच्या सलोखा वाढतो व मैत्री होते. भविष्यात नागपुरात होणाऱ्याअधिवेशनाचा कालावधी निश्चितपणाने वाढविण्यात येईल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.