केंद्र, राज्य शासनाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा; सोनिया सेठी यांचे विदर्भातील मनपा आयुक्तांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 10:43 AM2022-09-14T10:43:58+5:302022-09-14T12:50:50+5:30
मनपा कार्यालयात आयोजित बैठकीत सोनिया सेठी यांनी विदर्भातील महापालिकांत राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.
नागपूर : केंद्र, राज्य शासनाचे महत्त्वाचे विकासाचे प्रकल्प नागपूरसह विदर्भातील महापालिकांमध्ये सुरू आहेत. हे सर्व विकासाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा. असे निर्देश देत या प्रकल्पांमध्ये काही तांत्रिक, शासन स्तरावरून अडचणी असतील तर त्या मार्गी लावल्या जातील, असे राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी मंगळवारी येथे सांगितले.
मनपा कार्यालयात आयोजित बैठकीत सोनिया सेठी यांनी विदर्भातील महापालिकांत राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओ चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, अकोला मनपा आयुक्त कविता द्विवेदी, अमरावती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.
राधाकृष्णन बी. यांनी नागपूर महापालिका हद्दीत सुरू असलेल्या शासन पुरस्कृत विकास प्रकल्पाची माहिती दिली. अमृत एक व दोन, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, राज्य शासनाच्या नगरोत्थान अभियान, मूलभूत सोयीसुविधा प्रकल्प आदींवर चर्चा झाली. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नासुप्र व एनएमआरआयडीच्या विविध योजनांची माहिती दिली.
मनपाला ६०० कोटींची प्रतीक्षा
नागपूर शहरातील केळीबाग व जुना भंडारा रोड रुंदीकरण, स्मार्ट सिटी प्रकल्प, तलाव संवर्धन, ऑरेंज सिटी स्ट्रीट, सिमेंट रोड, व्यावसायिक संकुल निर्माण, सिवरेज प्रकल्प, सिमेंट रोड टप्पा- ३, अखंडित पाणी पुरवठा आदी विकास प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. यात यासाठी जवळपास ६०० कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झालेला नाही. बैठकीमुळे हा निधी प्राप्त होईल, अशी आशा आहे.
मनपातील महत्त्वाची रिक्त पदे भरणार
केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबविताना महापालिका व विविध विभागात समन्वय असावा, प्रकल्प गतीने पूर्ण करण्याच्या सूचना नगरविकास प्रधान सचिवांनी दिल्या. नागपूर शहरातील प्रकल्पासाठी निधीची मागणी केली. मनपा आकृतीबंधात मंजूर परंतु रिक्त असलेली महत्त्वाची पदे भरण्यासंदर्भात चर्चा केली. लवकरच ती भरण्याला अनुमती मिळेल.
राधाकृष्णन बी. आयुक्त तथा प्रशासक महापालिका