उद्योजकता मिशनद्वारे राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल - उपमुख्यमंत्री फडणवीस
By आनंद डेकाटे | Published: October 16, 2023 07:50 PM2023-10-16T19:50:52+5:302023-10-16T19:51:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योगामध्ये अधिक भांडवल व कौशल्य आणले आहे.
नागपूर : भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक अशी साखळी निर्माण करुन जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सहाय्यभूत ठरेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
राज्यात रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व ग्लोबल अलायन्स फॉर इंटरप्रोन्यूरशिप (गेम) द्वारे श्री. फडणवीस यांच्या हस्ते “महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन”च्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहातून कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गेमचे सह-अध्यक्ष आणि संस्थापक रवी व्यंकटेश, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह नागपूर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर आणि जळगावचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योगामध्ये अधिक भांडवल व कौशल्य आणले आहे. यालाच पूरक व्यवस्था महाराष्ट्रात तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात हा कार्यक्रम नागपूरसह, ठाणे, अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या ६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. २०२४ अखेरिस राज्यातील ५० टक्के जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्येही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. उद्योगाचे ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनच्या माध्यमातून उद्योजक घडतील, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मिती होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. राज्याचे तसेच देशाचे सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्र बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शिंदे यांनी आभार मानले. नागपूर येथील उपमुख्यमंत्री कार्यालयातून कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग नागपूरच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज आणि गेमच्या (नागपूर) समन्वयक स्नेहा मगर उपस्थित होत्या.