राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 10:55 PM2020-01-28T22:55:16+5:302020-01-28T23:01:38+5:30

हे सरकार माझे नव्हे तर आपले आहे. केवळ जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोच्या वेगाने धावणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.

The state's development train will run like a metro: Chief Minister Uddhav Thackeray | राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर मेट्रो रेल्वेच्या हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंजपर्यंतच्या ११ किमीच्या अ‍ॅक्वा लाईनचे मंगळवारी मुंबईहून व्हिडिओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महापौर संदीप जोशी, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित.

googlenewsNext
ठळक मुद्देमेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईनचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात विकासाचा वेग वाढला आहे. विकासात राजकारण न करता राज्यात विकासाची कामे त्याच वेगाने करायची आहे. हे सरकार माझे नव्हे तर आपले आहे. केवळ जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोच्या वेगाने धावणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंजपर्यंतच्या ११ किमीच्या अ‍ॅक्वा लाईनचे लोकार्पण मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे मंगळवारी सुभाषनगर स्टेशनवर करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. विकास ठाकरे, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, आ. प्रकाश गजभिये, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्रा, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित उपस्थित होते. केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण राज्यमंत्री यांनी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले.

विकासासाठी एकाच स्टेशनवर एकत्र : उद्धव ठाकरे


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, एका गाडीत एकत्र आलो नसलो तरी स्टेशनवर मात्र एकत्र आलो आहोत. एकमेकांचा हात, कामाची साथ आपण कधीही सोडणार नाही. भाषण करीत असताना त्या विषयाचा अभ्यास असावा लागतो. अभ्यासपूर्ण भाषण करणारे गडकरी यांच्यासारखे मंत्री राज्यातच नव्हे, तर देशातही दुर्मिळ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील मुंबई-पुणे महामार्गाचे काम त्यांनी वेळेपूर्वीच पूर्ण केले. गडकरी यांनी दिलेला शब्द पाळला होता, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाला त्वरित मंजूरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रकल्पाच्या मंजूरीसाठी गडकरींनी मदत करावी
मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर ही राज्याची उपराजधानी असून नागपूरला इतर शहरांच्या मागे पडू देणार नाही. राज्याचे अनेक प्रकल्प मंजूरीसाठी केंद्राकडे अडकले आहेत. त्यात नागपूर विमानतळाची निविदा आहे. त्याकरिता गडकरींनी मदत करावी. त्या वेळेत निकाली निघाल्यास विकास वेगात होण्यास मदत होऊ शकते.
मेट्रोची स्वच्छता आणि निगा राखण्याचे काम नागरिकांचे आहे. देशविदेशातील लोक मेट्रो पाहायला एकत्रित आले पाहिजेत. नागपुरात आल्यानंतर सर्वांसोबत मेट्रोने प्रवास करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

ब्रॉडगेज मेट्रोमुळे नागपूर होणार सॅटेलाईट सिटी : गडकरी


नऊ हजार कोटींच्या विस्तारीकरण प्रकल्पात मेट्रो हिंगणा, बुटीबोरी, कन्हान नदी पूल आणि कापसीपर्यंत जाणार आहे. तर ब्रॉडगेज मेट्रोमुळे नागपूर सॅटेलाईट सिटी होणार आहे. या प्रकल्पासाठी सामंजस्य करारही झाला आहे. ब्रॉडगेज मेट्रो काटोल, सावनेर, नरखेड, उमरेड, गोंदिया, वर्धा, वडसापर्यंत जाणार आहे. मेट्रोच्या पारडी, वर्धा रोड आणि कामठी रोडवरील उड्डाण पूलासाठी एनएचएआयने १५०० कोटी तर अजनी स्टेशन जगातील मल्टी मॉडेल पॅसेंजर हब बनविण्यासाठी एक हजार कोटी दिले आहेत. मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पात ९ हजार कोटींमध्ये १० टक्के वाटा मनपाला उचलायचा आहे. मेट्रोचा विस्तारित आणि ब्रॉडगेज मेट्रोसाठी ३०० ते ४०० मेट्रो कोचेस लागतील. कोसेस निर्मितीचा कारखाना वर्धेजवळील सिंधी येथे उभारावा. विकासासाठी कोणतेही राजकारण न करता मंत्र्यांच्या मागे उभे राहू, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. मिहान प्रकल्पात २८ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. पुढे मोठ्या कंपन्यांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी विकास मुत्तेमवार यांचेही नाव घेता येईल, असे गडकरी म्हणाले.

मेट्रो ग्रीन प्रकल्प : देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून वाहतूक यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. मेट्रो ग्रीन आणि परिणामकारक असून वाहनांवरील भार आणि प्रदूषण कमी होणार आहे. वेगवान कामसाठी गडकरींचे अभिनंदन आहे. मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच सुरू व्हावा. प्रकल्प अहवालातील त्रूटींची पूर्तता करून राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा. दुसरा टप्पा ४८ किमीचा असून उपनगराला जोडणारा आहे. तो लवकरच सुरू व्हावा, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

चांगल्या विकासाचे स्वागतच : नितीन राऊत
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात मेट्रो प्रकल्पावर सही झाली होती. चांगल्या विकासाचे स्वागतच आहे. महाविकास आघाडीचे सरकार जुने काम पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. फडणवीस यांच्या काळात मोठे उद्योग का आले नाहीत, याचे संशोधन करावे लागेल. दरवर्षी ५० हजार युवकांना रोजगार मिळेल, हे काम तुम्ही-आम्ही मिळून करू. मेट्रोचा विकास नितीन गडकरी आणि बृजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे.

सर्वांसाठी सुरक्षित मेट्रो : सुनील केदार
वेगवेगळ्या पक्षाचे नेते विकासात ताळमेळ साधण्याचे काम करीत आहेत. गडकरींनी विकासावर नेहमीच भर दिला आहे. नागपूर मेट्रोचा उल्लेख सर्वाधिक सुरक्षित म्हणून होणार आहे. सर्वांनी जास्तीत जास्त उपयोग करावा, असे सुनील केदार म्हणाले.

१६०० किमी मेट्रो पाच वर्षांत कार्यान्वित होणार : दुर्गाशंकर मिश्रा
देशात पुढील पाच वर्षांत १६०० किमी मेट्रो रेल्वे कार्यान्वित होणार असल्याची ग्वाही केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी दिली. नागपूर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन २१ ऑगस्ट २०१४ ला झाले होते. मिहान ते सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ऑरेंज लाईनचे लोकार्पण ७ मार्च २०१९ ला झाले. देशात १८ शहरात ६२५ किमी मेट्रो सुरू झाली असून त्यापैकी ५०० किमी पाच वर्षांत सुरू झाली. २३ शहरात ९२३ किमी मेट्रोचे काम सुरू आहे. ८०० किमी मेट्रोचे काम नव्याने सुरू होणार आहे. ४० किमीचा नागपूर मेट्रो प्रकल्प डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. मिश्रा यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला.

नागपूरकरांसाठी आनंदाचा दिवस : हरदीपसिंग पुरी
मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईनचे उद्घाटन हा नागपूकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे. आतापर्यंत २५ किमी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. डिसेंबर २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. ८६८० कोटींच्या प्रकल्पाचे काम जून २०१५ मध्ये सुरू झाले होते. कमी वेळेत पूर्ण होणारा प्रकल्प असल्याचे पुरी म्हणाले.

५० महिन्यात २५ किमी मेट्रो पूर्ण : बृजेश दीक्षित
महामेट्रोने नागपूर प्रकल्पात ५० महिन्यात २५ किमीचे काम पूर्ण केले आहे. दोन महिन्यात एक किमी, हा एक विक्रम आहे. प्रकल्प डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. वर्धा मार्गावरील ऑरेंज लाईनवर २१ हजार रायडरशिपचा टप्पा पार केला आहे. मार्च-२०१९ पूर्वी मेट्रोला १५० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

जय जवान, जय किसान संघटनेने दाखविले काळे झेंडे
महामेट्रो अ‍ॅक्वालाईनच्या लोकार्पण समारंभापूर्वी सुभाषनगर स्टेशनवर ‘जय जवान, जय किसान’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवित मेट्रो रेल्वेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करीत निदर्शने केली. तत्पूर्वी, सकाळीच संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांना बजाजनगर पोलिसांनी घराबाहेर जाण्यास मनाई केली. आंदोलन करणाऱ्या ४० ते ५० कार्यकर्त्यांपैकी अरुण वनकर व उत्तम सोलके यांना पोलिसांनी काळ्या झेंडासह अटक करून कार्यक्रमानंतर सोडून देण्यात आले.

Web Title: The state's development train will run like a metro: Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.