राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलणार; आरोग्यमंत्री दीपक सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 19:42 IST2017-12-21T19:41:37+5:302017-12-21T19:42:11+5:30
राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलण्याची आवश्यकता असून ते परिपूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलणार; आरोग्यमंत्री दीपक सावंत
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलण्याची आवश्यकता असून त्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट, फिजिशियन, न्यूरोसर्जन, रेडिओलॉजिस्ट यांची नेमणूक करून ते परिपूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. डॉक्टरांचे वेतन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य नीतेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्यासह जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्गसह राज्यातील डोंगरी भागात डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. डॉक्टरांची वेतनवाढ करण्याची आवश्यकता असून, सध्या राज्यात जे विशेषज्ञ डॉक्टर आहेत त्यांना ७० हजार रुपये किमान वेतन आणि प्रति शस्त्रक्रिया चार हजार रुपये अशा पद्धतीने दीड लाख रुपयांचे पॅकेज देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर ते आॅक्टोबरदरम्यान झालेल्या पावसामुळे लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. या भागात लेप्टोचे ८७ रुग्ण आढळून आले असून, डेंग्यूचे ५५ तर माकड तापाचे २०४ रुग्ण आढळले आहेत. लेप्टोसाठी डॉक्सिसाक्लॉन गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून, माकड तापासाठी तीन टप्प्यात लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ५०,९५७ जणांना लस देण्यात आली असून, ३२ हजार जणांनी दुसºया टप्प्यातील लस घेतली आहे. या लसीचे ७० लाख डोज प्राप्त झाले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस, सावंतवाडी आणि कणकवली या तीन ठिकाणी ट्रॉमा केअर सुरू आहेत. तळेरे येथे ट्रॉमा केअर प्रस्तावित असून, जागेअभावी ते अद्याप सुरू नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार, वैभव नाईक यांनी भाग घेतला.
सातत्याने गैरहजर राहणारे डॉक्टर बडतर्फ
जे डॉक्टर सातत्याने गैरहजर आहेत त्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा सातत्याने गैरहजर राहणाºया सर्व डॉक्टरदेखील बडतर्फ केले जातील, असेही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जाहीर केले.
राणे यांनी मालवणीतून मांडला प्रश्न
यासंबंधी आपण अनेकदा मराठीत सांगून झाले तरी सरकार ऐकत नाही. त्यामुळे आता मातृभाषेतूनच सांगावे लागेल, असे म्हणत नीतेश राणे यांनी सिंधुदुर्गमधील आरोग्याचा प्रश्न मालवणी भाषेतून विचारला. त्यावर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मालवणी भाषेत मला मालवणी येत असल्याचे सांगत मी मराठीतूनच उत्तर देईल, असे स्पष्ट केले.