राज्यभरातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी पुकारला बेमुदत संप; तीन वर्षीय नवीन डिप्लोमाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 07:12 PM2023-07-27T19:12:25+5:302023-07-27T19:12:25+5:30
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे (माफसू) तीन वर्षीय नवीन डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येत आहे.
आनंद डेकाटे
नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे (माफसू) तीन वर्षीय नवीन डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येत आहे. या कोर्सला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा विरोध आहे. यासंदर्भात विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. परंतु विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी आज गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. गुरुवारी राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालये व पशुवैद्यकीय दवाखाने बंद करून निदर्शने केली.
पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून नवीन डिप्लोमा सुरु केला जात आहे. १२ वी नंतर तीन वर्षीय हा डिप्लोमा आहे. आधीच जुना डिप्लोमा कोर्स आहे, अशा परिस्थितीत नवीन डिप्लोमा कोर्सची गरज काय? या कोर्सला विद्यार्थी करीत आंदोलन करीत होते. यातच सरकारने माफसूच्या कायद्यात बदल करून खासगी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी अधिकच संतापले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आधीच अनेक खासगी पशु महाविद्यालये हे केवळ कागदावर आहेत. यात आणखी भर घातल्यास बोगस पदविधरांची संख्या वाढेल. खऱ्या पशुवैद्यकीय सेवेचाां दर्जा खालावण्याचीही शक्यता आहे. तेव्हा या खासगीकरणाच्या विरोधात या विद्यार्थ्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे. गुरूवारी नागपुरातही पशुवैद्यकीय महाविद्यालये व शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन करून आपला निषेध नोंदवला.