अरुंधती रॉय यांचा पुतळा जाळला
By admin | Published: December 30, 2015 03:26 AM2015-12-30T03:26:18+5:302015-12-30T03:26:18+5:30
नक्षलवादाला वैचारिक विरोध असण्याचा दावा करणाऱ्या नागपुरातील भूमकाल संघटनेने मंगळवारी बुकर पुरस्कार विजेती लेखिका अरुंधती रॉय यांचा पुतळा दहन केला.
भूमकाल संघटनेची निदर्शने
नागपूर : नक्षलवादाला वैचारिक विरोध असण्याचा दावा करणाऱ्या नागपुरातील भूमकाल संघटनेने मंगळवारी बुकर पुरस्कार विजेती लेखिका अरुंधती रॉय यांचा पुतळा दहन केला. नक्षलवाद्यांचे समर्थन करणाऱ्या अरुंधती रॉय देशद्रोही असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने रॉय यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत त्यांना अवमानना नोटीस बजावली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांना मदत करीत असल्याचा आरोप असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्रा. जी.एन. साईबाबा यांचा जामीन नाकारून त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला मागील वर्षी अटक केली होती. त्यानंतर जून महिन्यात त्यांची जामिनावर सुटका झाली असून ही मुदत ३१ डिसेंबरला संपणार आहे. अरुंधती रॉय यांनी एका प्रतिष्ठित मॅगझीनमध्ये साईबाबांचा जामीन आणि न्यायालयाच्या भूमिकेबाबत आक्षेपार्ह लेख लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर खंडपीठाकडून रॉय यांच्या या लेखाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. न्या.ए.बी. चौधरी यांनी रॉय यांची भाषा अशोभनीय असल्याचे ताशेरे ओढले. रॉय स्वत:ला न्यायालयापेक्षा मोठ्या समजतात का, असा सवाल करीत न्यायालयाने त्यांना अवमानना नोटीस बजावली; सोबतच न्यायालयाने साईबाबाला अटक करण्याचे आदेशही दिले होते.
दत्ता शिर्के यांच्या नेतृत्वात मंगळवारी भूमकाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचशील चौकात अरुंधती रॉय यांचा पुतळा दहन करून त्यांचा निषेध केला. नक्षलवादी, काश्मिरी फुटीरवादी यांचे समर्थन करणाऱ्या अरुंधती रॉय आपल्या पेज-३ प्रतिमेचा उपयोग करून देशाची प्रतिमा मलीन करीत असल्याचा आरोप दत्ता शिर्के यांनी यावेळी केला. त्यांचे वर्तन लोकशाही आणि देशविरोधी असून न्यायालयाचा अपमान करणारे आहे, असा आरोपही शिर्के यांनी यावेळी केला. दरम्यान, या घटनेमुळे चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दत्ता शिर्के यांना अटक करून नंतर सुटका केली. (प्रतिनिधी)