सरकारी पैशांतून पुतळे उभारूच नयेत - नितीन गडकरी
By योगेश पांडे | Published: June 18, 2023 06:18 PM2023-06-18T18:18:06+5:302023-06-18T18:18:19+5:30
छत्रपती शिवाजी महाराज मला आईवडिलांहून अधिक प्रिय आहेत, असे गडकरी म्हणाले.
नागपूर : ज्ञानाच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा होत असल्याने नवीन पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल. हा पुतळा लोकसहभागातून तयार होणार असल्याची बाब कौतुकास्पद आहे. सरकारी पैशांतून पुतळे उभारूच नये असे माझे मत आहे. लोकांना फुकट मिळालेल्या गोष्टींचे महत्त्व नसते. आर्थिक योगदान दिले तरच लोकांना महत्त्व कळते, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची उभारणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग चौक परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारातीमध्ये होणार आहे. याच्या भूमीपूजनानंतर आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री अनिल देशमुख, आ.मोहन मते, आ.अभिजीत वंजारी, माजी आमदार जोगेंद्र कवाडे, तंजावर येथील प्रिंस शिवाजीराजे भोसले, कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, डॉ.बबन तायवाडे, स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.मुधोजी भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. तत्पुर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमीपूजन झाले.
छत्रपती शिवाजी महाराज मला आईवडिलांहून अधिक प्रिय आहेत. आम्हाला देशात शिवशाही आणायची आहे. छत्रपतींच्या विचारांच्या अनुरूप नवीन पिढी घडविण्याची गरज आहे.येत्या काळात विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनावरील साहित्य येथे उपलब्ध होईल. विद्यापीठ परिसरामध्ये ऑडिटोरियम उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा ‘लाईट शो’ करण्याबाबत विचार करता येईल, असे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व संत गजानन महाराज विजयग्रंथ हे डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच छत्रपतींच्या पुतळ्यासाठी पाच लाख रुपयांची देणगी दिली. शिवाजी महाराजांनी अन्यायी शासकांना शिक्षा देण्याचे काम केले होते. त्यांनी नेहमी जनतेसमोर प्रेरणा निर्माण केली. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अनिल देशमुख यांनी केले. समिती सचिव मंगेश डुके यांनी प्रास्ताविक केले तर शेखर सावरबांधे यांनी आभार मानले.
असा असेल पुतळा
छत्रपती शिवरायांचा विद्यापीठ पसिरात उभा राहणाऱ्या पुतळ्याच्या चुबतऱ्यांची लांबी २० फूट, रूंदी १५ फूट, उंची ९ फूट असेल तर या चबुतऱ्यांवर उभा राहणारा सिंहासनारूढ पुतळा ३२ फूट उंचीचा असेल. त्यावरील छत्र ७ फूट उंचीचे असेल. संपूण ब्राँझ धातूने बांधला जाणारा हा पुतळा १० हजार किलोग्रॅम वजनाचा असेल. प्रसिध्द मुर्तिकार सोनल कोहाड हे शिल्प साकारणार आहेत.