जयताळातील केंद्राची स्थिती : स्टाफकडूनच स्वॅब तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 09:59 PM2020-08-29T21:59:01+5:302020-08-29T22:01:39+5:30

जयताळा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णसंख्येचा भार अधिक आहे. असे असले तरी येथे एकमेव असलेल्या लॅब टेक्निशियन महिला कर्मचाऱ्यावर सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचाही भार आहे. परिणामत: केवळ एक दिवसाच्या प्रशिक्षणावर येथील स्टॉफमधील परिचारिकाच स्वॅब तपासणी करतात, नमुने घेतात आणि १५ मिनिटात रिपोर्टही देतात, अशी स्थिती शनिवारी दुपारी दिलेल्या भेटीदरम्यान पहावयास मिळाली.

Status of Jayatala Center: Swab check by staff only | जयताळातील केंद्राची स्थिती : स्टाफकडूनच स्वॅब तपासणी

जयताळातील केंद्राची स्थिती : स्टाफकडूनच स्वॅब तपासणी

Next
ठळक मुद्दे लॅब टेक्निशियनवर अतिरिक्त भार : १५ मिनिटात मिळतो रिपोर्ट

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जयताळा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णसंख्येचा भार अधिक आहे. असे असले तरी येथे एकमेव असलेल्या लॅब टेक्निशियन महिला कर्मचाऱ्यावर सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचाही भार आहे. परिणामत: केवळ एक दिवसाच्या प्रशिक्षणावर येथील स्टॉफमधील परिचारिकाच स्वॅब तपासणी करतात, नमुने घेतात आणि १५ मिनिटात रिपोर्टही देतात, अशी स्थिती शनिवारी दुपारी दिलेल्या भेटीदरम्यान पहावयास मिळाली.
या केंद्रावर रुग्णसंख्येचा भार अधिक आहे. सकाळपासूनच कोविड १९ची चाचणी करून घेणाऱ्यांची गर्दीही अधिक असते. शनिवारी दुपारी १.४५ वाजेपर्यंत या केंद्रावर ९४ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. तरीही जवळपास ९ ते १० नागरिक प्रतीक्षेत होते. दुपारपर्यंत झालेल्या चाचण्यांमधून चार रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह निघाले. या सर्वांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केल्यावर प्रमाणपत्र देण्याचे काम येथील परिचारिका करताना दिसल्या. सकाळी ९.१५ वाजता नागरिकांना प्रवेश देऊन १०.३० वाजता तपासणीचे काम सुरू केले जाते. दुपारी २ वाजेपर्यंत हे काम चालते. दिवसभरात सरासरी १०० नमुने तपासले जातात. २७ आॅगस्टला ९२ नमुने तपासण्यात आले. त्यातील ११ नमुने पॉझिटिव्ह निघाले. २८ आॅगस्टला ५५ नमुने तपासण्यात आले. त्यात ५, तर २९ आॅगस्टला दुपारी १.४५ वाजेपर्यंत तपासलेल्या नमुन्यांमध्ये ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याची नोंद येथील रजिस्टरवर घेण्यात आली आहे.
केंद्रावरील परिचारिकांना पुरेसे ग्लोव्ज पुरविण्यात आलेले नाहीत. एक परिचारिका फाटलेले ग्लोव्ज घालून काम करताना दिसली. तोंडावरील शिफ्ड मात्र नवे होते. ते आजच मिळाल्याचे चर्चेतून समजले.

१५ मिनिटात मिळणाऱ्या रिपोर्टवर शंका
या केंद्रावर तपासणी झाल्यावर अवघ्या १५ मिनिटात रिपोर्ट मिळतो. त्यामुळे एवढ्या तडकाफडकी मिळणाऱ्या या रिपोर्टवर रुग्णांनी शंका व्यक्त केली. एक रुग्ण म्हणाला, माझ्या भावाला कसलाही त्रास नसताना त्याचा नमुना पॉझिटिव्ह आला. फक्त १५ मिनिटात रिपोर्ट मिळाल्याने त्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा त्याचा प्रश्न होता.

पॉझिटिव्ह रुग्णालाही गृह विलगीकरणाचा सल्ला
या केंद्रावर शनिवारी पॉझिटिव्ह निघालेल्या एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करून न घेता गृह विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. दवाखान्याचे वाहन घरीच येऊन औषधोपचार करेल, असे सांगण्यात आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.

बाबूळखेडा आरोग्य केंद्रात दररोज शंभरावर तपासणी


महापालिकेचे बाबूळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १०० च्या जवळपास कोविड-१९ ची तपासणी केली जाते. येथील महिला कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ ते १०.३० पर्यंत येणाऱ्या व्यक्तींची चाचणीसाठी नोंदणी केली जाते. नंतर आदल्या दिवशी केलेल्या तपासणीचे रिपोर्ट दिले जातात. त्यानंतर स्वॅब तपासणीला सुरुवात केली जाते. ५० लोकांच्या तपासणीचे लक्ष्य आहे, मात्र जवळपास १०० व्यक्तीची तपासणी केली जात असल्याचे आणि टोकननुसार ४ वाजेपर्यंत ती चालत असल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत तपासणीचा वेळ दिला आहे, त्यामुळे या वेळात अनेक लोकांची तपासणीसाठी गर्दी होते पण एवढ्या लोकांची तपासणी शक्य होत नसल्याने अनेकांना निराश होऊन परतावे लागते. ठराविक वेळ आणि मर्यादित संख्येबाबत माहिती मिळण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागतो. तशी व्यवस्था करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title: Status of Jayatala Center: Swab check by staff only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.