शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:33 PM2019-06-28T23:33:42+5:302019-06-28T23:35:47+5:30
नागपूर : उपराजधानीतील शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेन्ट अॅन्ड अॅक्रेडिटेशन कॉन्सिल) तर्फे ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. १९०९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा कायम राखली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेन्ट अॅन्ड अॅक्रेडिटेशन कॉन्सिल) तर्फे ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. १९०९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा कायम राखली आहे.
२०१९ ते २०१४ या कालावधीसाठी ‘नॅक’ बंगळुरूच्या ‘पिअर’ चमूने १७ व १८ मे रोजी शासकीय विज्ञान संस्थेला भेट देऊन सखोल पाहणी केली होती. संस्थेतील पायाभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा, संशोधनाची व्याप्ती इत्यादींबाबत त्यांनी माहिती घेतली होती. याशिवाय माजी विद्यार्थी, विद्यार्थी, पालक इत्यादींशी संवाददेखील साधला. विविध पदवी, पदव्युत्तर विभागातील प्रगतीचा आलेख, संशोधनकार्य, इत्यादीबाबत बारीकसारीक बाबींची चिकीत्सा केली होती. निरीक्षणानंतर ‘नॅक’च्या चमूने मुख्यालयाला अहवाल पाठविला व काही दिवसांअगोदर संस्थेला ‘अ’ दर्जा मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले. संस्थेचे संचालक डॉ.रामदास आत्राम यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. शासकीय विज्ञान संस्थेची इमारत ही ब्रिटिशकालीन असून ‘हेरिटेज’ दर्जा प्राप्त झाला आहे हे विशेष.
शासकीय विज्ञान संस्थेला ‘अ’ दर्जा मिळाला ही समाधानाची बाब आहे. आम्ही जे ध्येय घेऊन निघालो होतो त्यात यश मिळाले. याचे श्रेय संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना जाते. सर्वांनी एकत्रितपणे एक ‘टीम’ म्हणून काम केले होते, अशी भावना डॉ.आत्राम यांनी व्यक्त केली.