जागते रहो! बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे राज्यातील सर्व रेल्वेस्थानकांवर रात्रभर हायअलर्ट
By नरेश डोंगरे | Published: July 7, 2023 06:41 PM2023-07-07T18:41:39+5:302023-07-07T18:42:19+5:30
Nagpur News बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर गुरुवारी पोलिसांचा खडा पहारा देण्यात आला होता.
नरेश डोंगरे
नागपूर : सकाळी रेल्वेगाड्यांमध्ये खचाखच गर्दी असते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आहे. त्यानंतर आपण सर्व आपले फोन बंद करू आणि एका ठिकाणी भेटू असे मेसेज एका तरुणाच्या मोबाईलवर आले. ही माहिती पोलिसांना कळाली आणि राज्यातील अवघी सुरक्षा यंत्रणाच खडबडून जागी झाली. या धमकीमुळे राज्यातील सर्वच रेल्वेस्थानकांना गुरुवारी हायअलर्ट देण्यात आला. त्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या विविध स्थानकांवर रेल्वे पोलिसांनी रात्रीपासून आज दुपारपर्यंत स्फोटकं शोधण्यासाठी दमछाक केली.
शुक्रवारी सकाळी ९ च्या आत रेल्वेगाडीत बॉम्बस्फोट केले जाणार असल्याची धमकी या समाजकंटकाने दिली मात्र स्फोट कुठे, कोणत्या गाडीत होणार, ते आरोपीने सांगितले नाही. त्यामुळे धमकीची माहिती कळताच मुंबई नव्हे तर अवघी राज्य पोलीस यंत्रणाच खडबडून जागी झाली. शुक्रवारी पहाटे २ वाजता नागपूरसह राज्यातील सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांना स्फोटाच्या धमकीची माहिती मिळाली. खबरदारीच्या उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले. त्यानुसार, पहाटेपासून शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ठिकठिकाणच्या रेल्वेस्थानकांवर कसून तपासणी करण्यात आली. नागपूर रेल्वे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) मदतीने नागपूरातील मुख्य रेल्वेस्थानकासोबतच अजनी, ईतवारी, कळमना आणि आजुबाजुच्याही रेल्वेस्थानकावर सशस्त्र बंदोबस्त लावला. बॉम्बशोधक तसेच नाशक पथक (बीडीडीएस), श्वानांच्या मदतीने रेल्वेस्थानकांंच्या कानाकोपरा पिंजून काढण्यात आला. सकाळी ९ वाजेपर्यंत कुठे काही स्फोटकं मिळतात काय, ते शोधण्यात आले. दुसरीकडे प्रत्येक व्यक्तीची बॅग, साहित्य स्कॅनरच्या माध्यमातून तपासण्यात आले. संशयीत व्यक्तींचीही झाडाझडती घेण्यात आली. दुपारचे १२ वाजेपर्यंत हे काम अविश्रांत सुरू होते. सुदैवाने कुठे काहीही आढळले नाही. त्यामुळे रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.
गोव्यात सापडला आरोपी
दरम्यान, पोलिसांनी मोबाईलवरून आरोपीचा माग शोधला. धमकीचे मेेसेज पाठविणारा आरोपी उत्तर गोव्यात असल्याचे लक्षात येताच मुंबई पोलिसांनी आज भल्या सकाळी धमकी देणाऱ्या आरोपीलाही बेड्या ठोकल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.
नागपूरमध्ये जास्तच धाकधूक
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शुक्रवारी सकाळीच नागपुरात दाखल होणार होते. त्यांची नागपूर-भुसावळ विभागातील खासदारांसोबत बैठक होती. त्यामुळे नागपूर रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनाची धाकधूक जास्तच वाढली होती. रात्रभर जागरण करून शोधाशोध करणाऱ्या रेल्वे पोलिसांना आज दुपारी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने 'तो' फेक कॉल असल्याचे कळविले. तेव्हा कुठे रेल्वेशी संबंधित यंत्रणांचा जीव भांड्यात पडला.