घरकूल द्या, भटकंती थांबवा
By admin | Published: July 26, 2016 02:31 AM2016-07-26T02:31:13+5:302016-07-26T02:31:13+5:30
स्वातंत्र्यानंतरही मागील ६६ वर्षांपासून विमुक्त भटक्या जमाती या भटकंतीच करीत आहेत; ...
भटके विमुक्तांची मागणी : तहसील कार्यालयांवर धडक
नागपूर : स्वातंत्र्यानंतरही मागील ६६ वर्षांपासून विमुक्त भटक्या जमाती या भटकंतीच करीत आहेत; तेव्हा आम्हाला घरकूल द्या, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व द्या आणि आमची भटकंती थांबवा, अशी मागणी करीत शेकडोंच्या संख्येने भटके विमुक्त समाजबांधवांनी सोमवारी तहसील कार्यालयांवर धडक दिली.
संघर्ष वाहिनी या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी संविधान चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. भटके विमुक्तांना घरकूल मिळावे, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व मिळावे, मासेमारी करणाऱ्या लोकांवर मस्त्यव्यवसाय विभागाच्या २६ जून २०१४ च्या आदेशाने उपासमारीचे संकट आले त्यामुळे तो आदेश ताबडतोब रद्द करावा, भूमिहीनांना जमीन मिळाव्यात, बेरोजगारांना रोजगार मिळावा, सुलभ कर्ज मिळावे, जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी कागदपत्रांच्या अटी शिथिल कराव्यात, क्रिमीलेयरची अट रद्द व्हावी, जिल्हास्तरावर वसतिगृह मिळावे, धरणग्रस्त मासेमाऱ्यांना मासेमारीचे हक्क द्या, शाळेत मुलाना गणवेश मिळावा, राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. नागपूरसह सर्व १३ तालुके आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालयांवर एकाच वेळी मोर्चा काढण्यात येऊन या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणयात आले.
राजेंद्र बडीये यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात पुंडलिक बावनकुळे, गजानन बोराल, पंकज बनसोड, धर्मपाल शेंडे, श्रीराम गोहोणे, प्रमोद मेश्राम, मनीष बात्हो, शंकर पुंड, विनायक सूर्यवंशी, गोविंद राठोड, सदाशिव हिव्लेकर, विनोद आकुलवार, दिलीप कैलूके, दिलीपसिंग सूर्यवंशी आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शासनाच्या निषेधार्थ मुंडण
भटके विमुक्त समाजबांधवांच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वीसुद्धा विदर्भातील ४२ तहसील कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. परंतु शासनाकडून त्या मोर्चाची साधी दखलही घेण्यात आली नाही. शासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून मुंडणसुद्धा करण्यात आले.