जिल्हा परिषदेंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनाची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 08:39 PM2019-12-06T20:39:19+5:302019-12-06T20:40:43+5:30
महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्याबरोबरच जुन्या सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या कामाला स्थगिती दिली आहे. यात जिल्हा परिषदेंतर्गत गावातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी (२५१५-१२३८) या हेड सह ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचा समावेश आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्याबरोबरच जुन्या सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या कामाला स्थगिती दिली आहे. यात जिल्हा परिषदेंतर्गत गावातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी (२५१५-१२३८) या हेड सह ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचा समावेश आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागाने यासंदर्भातील पत्र सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना पाठविले आहे.
राज्यात आतापर्यंत भाजपाचे सरकार होते. आता महाआघाडीने सरकार स्थापन केले आहे. गेल्या सरकारची कुठलेही कामे थांबविण्यात येणार नाही, असे नव्या सरकारच्या मंत्र्यांनी सांगितले आहे. असे असताना जिल्हा परिषदेंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेले २५१५ हेडवरील, कोकण पर्यटन विकास कार्यक्रम, यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकास या योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये मंजूर कामांना स्थगिती दिली आहे. परंतु या मंजूर कामापैकी ज्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहे, अशा कामांना शिथिलता दिली आहे. ज्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहे त्या कामांची यादी ग्रामविकास विभागाने तात्काळ मागितली आहे. त्यातही स्पष्ट केले की, वेळेत ज्या कामांचे कार्यारंभ आदेश प्राप्त होणार नाही, ते काम स्थगित झाले असे समजण्यात यावे. नवीन सरकार स्थापन झाल्याबरोबर घेतलेला हा निर्णय म्हणजे लोक प्रतिनिधींचे खच्चीकरण करण्याचा प्रकार असल्याची ओरड होत आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या या दोन्ही हेडवरील कामाच्या स्थितीचे अवलोकन केले असता, जिल्ह्यात २५१५ या हेड अंतर्गत २०१९-२० १३.५० कोटीचे २१३ कामे मंजूर करण्यात आली होती. यातील १४० कामांचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला होता. जवळपास ५ कोटीची कामे प्रलंबित होती. तसेच ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचे ६ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यातील ५ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मात्र १ काम पाणीपुरवठा विभागाचे असल्यामुळे थांबविण्यात आले होते.
नागपूर जिल्हा परिषदेने मंजूर कामाचा कार्यारंभ आदेश जारी केल्यामुळे बहुतांश कामे पूर्णत्वास जाईल. पण अनेक जिल्हा परिषदेत या कामाची काय अवस्था आहे, हे लक्षात घेतल्यास मोठ्या प्रमाणात कामांना स्थगिती मिळणार आहे. जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की, कार्यारंभ दिलेल्या कामांची माहिती आम्ही संंबंधित विभागाला पाठविणार आहोत.