हावडा मार्गावरील तीन गाड्यात चोरी
By admin | Published: August 21, 2015 03:31 AM2015-08-21T03:31:25+5:302015-08-21T03:31:25+5:30
हावडा मार्गावरील तीन वेगवेगळ्या रेल्वेगाड्यात प्रवाशांचा तीन प्रवाशांचा १.६७ लाखाचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी पळविल्याची घटना घडली.
नागपूर : हावडा मार्गावरील तीन वेगवेगळ्या रेल्वेगाड्यात प्रवाशांचा तीन प्रवाशांचा १.६७ लाखाचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी पळविल्याची घटना घडली.
पहिल्या घटनेत रेल्वेगाडी क्रमांक १२४०९ गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये रामनिवास जैन (७८) रा. लेलुंगा जि. रायगड हे बी-२, बर्थ क्रमांक ३९ वरून प्रवास करीत होते. बिलासपूर रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या दोन सुटकेस पळविल्या. त्यात रोख ४० हजार, २० हजार रुपयांचे कपडे असा एकूण ६० हजाराचा मुद्देमाल होता. दुसऱ्या घटनेत विजयालक्ष्मी स्वायन (५५) रा. सेतु चन्नाब रोड, जि. जमशेदपूर या रेल्वेगाडी क्रमांक १२८१० हावडा-मुंबई मेलने (कोच ए-१, बर्थ २९) प्रवास करीत होत्या. अज्ञात आरोपीने त्यांची बॅग पळविली. त्यात एकूण ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल होता. तिसऱ्या घटनेत सुजयकुमार शहा रा. कुस्तीवाटिका मकरपुरा वडोदरा हे रेल्वेगाडी क्रमांक १२१३० आझाद हिंद एक्स्प्रेसने (कोच ए-१, बर्थ ३७) प्रवास करीत होते. बिलासपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटल्यानंतर अज्ञात आरोपीने त्यांची नजर चुकवून त्यांची सुटकेस पळविली. सुटकेसमध्ये ५ हजार रुपये रोख, २ घड्याळ, कपडे असा एकुण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)