स्टील, सिमेंट महागाईमुळे बांधकाम क्षेत्र हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:13+5:302021-02-23T04:11:13+5:30
आनंद शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अगोदर ‘कोरोना’चा प्रहार व आता महागाईचा मार यामुळे बांधकाम क्षेत्रातील लोक हवालदिल ...
आनंद शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगोदर ‘कोरोना’चा प्रहार व आता महागाईचा मार यामुळे बांधकाम क्षेत्रातील लोक हवालदिल झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून स्टील, सिमेंट व रेतीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढीस लागला आहे. काही कॉर्पोरेट कंपन्यांनी ‘कार्टेलिंग’च्या माध्यमातून या किमती वाढविल्याचा आरोप होत आहे. जर हीच स्थिती राहिली तर येणा-या काळात इमारतींचे दर वाढू शकतात.
काही कॉर्पोरेट कंपन्यांमुळे जून २०२० पासून आतापर्यंत स्टील-सिमेंटचे दर सरासरी ३५ ते ४० टक्के वाढले आहे. त्यामुळे बांधकाम खर्च वाढला आहे. जर हीच स्थिती राहिली तर फ्लॅट्स, घरे, दुकानांचे दर वाढवावे लागू शकतात, असे प्रतिपादन ‘बीएआय’चे (बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया) अध्यक्ष अनिल नायर यांनी केले आहे. दर वाढवावे लागू नये, यासाठी स्टील-सिमेंटच्या दरांच्या नियमनासाठी प्राधिकरण बनविण्याची मागणी ‘बीएआय’ने केली आहे.
‘क्रेडाई’ नागपूर मेट्रोचे अध्यक्ष महेश साधवानी आणि सचिव गौरव अगरवाला यांना सांगितले की, स्टील-सिमेंटचे दर वाढल्यामुळे परवडणारे घरकुल ही संकल्पनाच संपत आहे. पंतप्रधान आवास योजनेवरदेखील प्रतिकूल परिणाम होत आहे.
घर खरेदी करण्याची योग्य संधी
सद्य:स्थितीत बिल्डर्स व कंत्राटदार वाढलेला खर्च कसा तरी सहन करत आहे. परंतु, महागाई कायम राहिली तर त्यांना नाइलाजाने इमारतींचे दर प्रतिचौरस फुटाने दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढवावे लागतील. याचे ओझे ग्राहकांवरच येईल. त्यामुळे सद्य:स्थितीत घर खरेदी करण्याची योग्य संधी आहे. शिवाय, स्टॅम्पड्युटीमध्ये मिळणा-या सवलतींचादेखील फायदा मिळू शकतो.
असे वाढले दर?
व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून २०२० मध्ये प्रतिबॅग सिमेंटचे सरासरी दर २२० रुपये होते. आता हे वाढून ३२०-३२५ रुपये झाले आहेत. बिल्डर्सकडून घेण्यात येणा-या ‘ओपीपी’ दर्जाच्या सिमेंटचे दर प्रतिबॅग २१५ ऐवजी २७५ रुपये झाले आहेत. स्टीलचे दर अगोदर ३२ हजार रुपये प्रतिटन होते. आता ते वाढून ४८ हजार रुपये प्रतिटन झाले आहेत. रेतीचेदेखील दर वाढले आहेत.