ओबीसींना दिलेल्या आश्वासनावर ठाम राहा; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील - विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:02 AM2023-10-17T11:02:56+5:302023-10-17T11:05:47+5:30
ओबीसी संघटनांच्या बैठकीत वडेट्टीवार यांचा इशारा
नागपूर : ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावला जाणार नाही असे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यावर ठाम राहावे. अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
सोमवारी रविभवन येथे आरक्षणाच्या विषयावर मंथन करण्यासाठी विदर्भातील ओबीसी संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. तीत वडेट्टीवार यांनी ओबीसी आंदोलनाची भविष्यातील भूमिका कशी राहील, याबाबत उपस्थितांशी संवाद साधला. वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या हक्कासाठी ‘करेंगे या मरेंगे ’अशी भूमिका ठेवून लढणार असल्याचे स्पष्ट केले.
ओबीसीमध्ये ३५० ते ३७५ जातींचा समावेश आहे. ओबीसींना आज जे काय मिळते त्यात वाढ करण्याच्या भूमिकेत सरकार नाही. मराठा समाजाला उचकविण्याचा प्रयत्न काही शक्ती करीत आहेत. कुणाला काय देता ते द्या, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या जरांगे यांच्या भूमिकेला विरोध असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, आ.अभिजीत वंजारी आदी याप्रसंगी उपस्थित होते.
ओबीसी नेत्यांना टार्गेट कराल तर जशास तसे प्रत्युत्तर
सोशल मीडियावर ओबीसी नेत्यांना काही लोकांकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला. जरांगे एका समाजासाठी लढत आहेत तर आम्ही ओबीसी समूहासाठी लढत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
२६ नोव्हेंबरला नागपुरात भव्य सभा
ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी संघर्ष करण्यासाठी विविध संघटना व घटकांची सर्वसमावेशक कृती समिती गठित केली जाणार आहे. दोन-चार दिवसांत समितीची घोषणा केली जाईल. संविधान दिनी २६ नोव्हेंबरला नागपुरात भव्य सभा आयोजित करणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
पटोले यांची बैठक पक्षस्तरावर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी मुंबईत ओबीसी संघटनांची बैठक घेतली. तर नागपुरातही वडेट्टीवार यांचीही बैठक कशी, असा प्रश्न करता वडेट्टीवार म्हणाले, मुंबईतील बैठक पक्षस्तरावर आहे. तर नागपुरात विरोधी पक्षनेता म्हणून ओबीसी संघटनांची बैठक घेत आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांच्या महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होण्याच्या विधानावर वडेट्टीवार म्हणाले, काही दिवस माल खाऊन गेलेले पुन्हा महाविकास आघाडीत दिसतील.