राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 11:14 AM2022-12-10T11:14:07+5:302022-12-10T11:14:52+5:30
महाविकास आघाडी सरकारमुळे रखडले होते मेट्रो फेज-२ व नागनदी प्रकल्प
नागपूर : राज्यात लव्ह जिहादचा कायदा येणार का याबाबत चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात सरकारकडून पावले उचलली जाणार, असे कयास लावण्यात येत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
लव्ह जिहादच्या कायद्यासंदर्भात पडताळणी करतो आहे. कायदा आणण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केले आहेत याचा अभ्यास सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते नागपुरात शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हा मार्ग विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरेल. केंद्राने मेट्रोच्या फेज-२ तसेच नागनदी शुद्धिकरण प्रकल्पालादेखील मान्यता दिली आहे. मुळात यासंदर्भात आमचे सरकार असताना २०१९ मध्येच प्रस्ताव केंद्राकडे पाठविले होते. त्यात काही लहान त्रुटी काढण्यात आल्या होत्या. मात्र, अडीच वर्षांत महाविकासआघाडीच्या सरकारने त्या त्रुटींचे निराकरण करण्यासाठी काहीच पावले उचलली नाही. अखेर आम्ही परत सत्तेत आल्यावर त्या त्रुटी दूर करून प्रस्ताव परत पाठविले. केंद्राने अवघ्या चार आठवड्यांत प्रकल्पांना मंजुरी दिली, असे फडणवीस यांनी सांगितले.