स्टिंग ऑपरेशन! ११० खाटांच्या रुग्णालयाला रात्री १० नंतर लागते कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 07:00 AM2021-10-22T07:00:00+5:302021-10-22T07:00:07+5:30
Nagpur News रात्री, बेरात्री अडलेल्या रुग्णांवर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांचा जीव वाचावा, यासाठी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयावर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होतात. परंतु, ११० खाटांचे हे रुग्णालय रात्री १० वाजताच कुलुपात बंद होते.
सुमेध वाघमारे
नागपूर : रात्री, बेरात्री अडलेल्या रुग्णांवर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांचा जीव वाचावा, यासाठी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयावर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होतात. परंतु, ११० खाटांचे हे रुग्णालय रात्री १० वाजताच कुलुपात बंद होते. डॉक्टर नसल्याचे कारण सांगून प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतींपासून ते अपघाताच्या रुग्णांना दारातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येतो. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून हे वास्तव पुढे आले आहे.
‘मुंबई प्रांतीय म्युनिसिपल कायदा १९४९’मधील ‘कलम ६३’ नुसार प्राथमिक आरोग्यसेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडल्याचे दिसून येते. एकूण आरोग्यकारक परिस्थितीचा अभाव व जोडीला आरोग्यसेवांची भीषण दुरवस्था व विषमता यामुळे नागरिकांच्या आरोग्याची गुणवत्ता ढासळत असल्याचे चित्र आहे.
असे केले ‘स्टिंग ऑपरेशन’
तारीख १९ ऑक्टोबर, वेळ रात्री ९.४५ वाजताची. ‘लोकमत’ची चमू मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयाच्या मुख्य द्वाराला कुलूप होते. जोरजोरात आवाज दिल्यावर दारावर कर्मचारी आला. प्रसूतीसाठी गर्भवती महिलेला आणत आहे, असे सांगताच तो ओरडायला लागला. येथे डॉक्टर, रात्री प्रसूती होत नाही, असे सांगत त्याने मेयो रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सध्या रुग्णालयात कोण आहे, असे विचारल्यावर त्याने एक परिचारिका व एक रुग्ण भरती आहे, अशी माहिती दिली. परिचारिकेला भेटू द्या, अशी विनंती केल्यावर सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. परंतु नंतर रुग्णालयाच्या आत जाऊ दिले. कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेनेही रात्री डॉक्टर राहत नसल्याचे सांगत, प्रसूती कोण करणार हा उलट प्रश्न विचारला. डॉक्टर राहत नसल्याने रात्री इतरही आजाराचे रुग्ण आम्ही घेत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सायंकाळ होताच गायब होतात डॉक्टर
मनपाच्या या इंदिरा गांधी रुग्णालयावर लाखो रुपये खर्च करून नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. जास्तीतजास्त रुग्णांवर उपचार व्हावे म्हणून ७० वरून ११० खाटा करण्यात आल्या. विशेषत: प्रसूतीसाठी आलेल्या महिलांवर तातडीने उपचार मिळावे, ३० खाटांचा वेगळा वॉर्ड व अद्ययावत प्रसूती कक्ष आहे. त्यांच्या सेवेत चार स्त्रीरोगतज्ज्ञ व एक बालरोगतज्ज्ञ आहे. परंतु रात्री ६ वाजताच डॉक्टर गायब होत असल्याच्या तक्रारी आहेत. रात्री केवळ एक परिचारिका व एक अटेन्डंटवर रुग्णालयाची जबाबदारी असते.
तक्रार आल्यावर कारवाई करू
मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय २४ तास रुग्णसेवेत सुरू असते. रात्री डॉ. गाडवे यांची ड्युटी असते. ते जर रात्री राहत नसतील आणि तशी तक्रार असेल तर त्याची चौकशी करून कारवाई करू.
-डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी (दवाखाने) मनपा