साठेबाजांनी कृत्रिमरित्या वाढविले खाद्यतेलाचे दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:00 PM2020-10-12T12:00:33+5:302020-10-12T12:03:50+5:30
edible oil Nagpur News भाज्या, डाळींच्या किमती वाढल्यानंतर आता खाद्यतेल खरेदीसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. महागाईचा चढता आलेख पाहता साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी किरकोळ विक्रेत्यांनी केली आहे.
मोरेश्वर मानापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खाद्यतेल उत्पादक, ठोक विक्रेते आणि साठेबाजांनी यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी असल्याचे कारण सांगून आठवड्यातच सोयाबीन तेलाचे दर किलोमागे आठ रुपयांनी वाढविले आहे. भाज्या, डाळींच्या किमती वाढल्यानंतर आता खाद्यतेल खरेदीसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. महागाईचा चढता आलेख पाहता साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी किरकोळ विक्रेत्यांनी केली आहे.
रविवारी सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो १०४ रुपयांवर पोहोचले आहे. ते गेल्या रविवारी ९६ रुपयांवर होते. याचप्रमाणे सनफ्लॉवर तेल प्रति किलो २० रुपये वाढीसह ११९ रुपये आणि राईस ब्रॅण्ड तेलाचे दर प्रति किलो ६ रुपयांनी वाढून १०७ रुपयांवर पोहोचले आहे. यंदा सोयाबीनचे पीक कमी आल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर व्यापाऱ्यांनी दरवाढ सुरू केली. पुढे नवरात्र, दसरा आणि दिवाळी आहे. अशीच दरवाढ सुरू राहिली तर दरवाढ भरमसाट होणार होईल, अशी शक्यता काही व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यापूर्वी कोरोना काळात व्यापाऱ्यांनी सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो १०६ रुपयांपर्यंत वाढविले होते. शासनाने दर निश्चित केल्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशीपासूनच दर कमी झाले होते. ही दरवाढ आणि दरकपात कशी होते, हे एक गूढच असल्याचे किरकोळ विक्रेते म्हणाले.
मूग गिळून बसला आहे अन्न विभाग
दरदिवशी वाढणाऱ्या अन्नपदार्थांच्या दराची माहिती अन्न व औषध विभागाकडे असते. पण विभाग व्यापा?्यांवर कारवाई करीत नाहीत. केवळ सणांनिमित्त तपासणी मोहीम राबवून अधिकारी वाहवा मिळवितात. ठोक कारवाई आणि व्यापाऱ्यांना पूर्वीच इशारा दिल्यास दरवाढ करण्याची हिंमत उत्पादक आणि ठोक व्यापारी करणार नाहीत. पण बातम्या छापून आल्यानंतर अधिकारी कारवाई करतात. पण तोपर्यंत व्यापारी साठा इतरत्र हलवितात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हातात काहीच लागत नाही, असा आरोप किरकोळ व्यापाऱ्यांनी केला.
खाद्यतेल दरवाढीचा तक्ता
खाद्यतेल ४ ऑक्टो. ११ ऑक्टो.
सोयाबीन ९६ रु. १०४ रु.
सनफ्लॉवर ९९ रु. ११९ रु.
राईस ब्रॅण्ड १०१ रु. १०७ रु.
शेंगदाना १४० रु. १४७ रु.
साठेबाजांवर कारवाई करा
दरवाढीच्या संदर्भात विभागाचे अधिकारी आधीच सजग राहिल्यास कृत्रिम दरवाढीची मोठ्या व्यापाऱ्यांना भीती वाटेल. पण असे घडत नाही. दरवाढ झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे डोळे उघडतात आणि कारवाईसाठी पुढाकार घेतात. पण तोपर्यंत सर्व निस्तरले असते. मोठे व्यापारी नफा कमवून मोकळे होतात. याचा फटका गरीब आणि सामान्यांना बसतो. साठेबाजांवर कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी गांभीयार्ने लक्ष द्यावे.
ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.