दिवाळीत साठेबाजांनी १० रुपयांनी वाढविले सोयाबीन खाद्यतेलाचे दर; भेसळयुक्त तेलाची मोठ्या प्रमाणात विक्री
By मोरेश्वर मानापुरे | Published: November 18, 2023 07:16 PM2023-11-18T19:16:54+5:302023-11-18T19:17:09+5:30
तब्बल तीन महिने खाद्यतेलाचे दर घसरत असतानाच दिवाळीच्या दिवसात सर्वाधिक विक्रीचे सोयाबीने तेलाचे प्रतिकिलो दर १० रुपयांनी अचानक वाढले.
नागपूर : तब्बल तीन महिने खाद्यतेलाचे दर घसरत असतानाच दिवाळीच्या दिवसात सर्वाधिक विक्रीचे सोयाबीने तेलाचे प्रतिकिलो दर १० रुपयांनी अचानक वाढले. दसरा ते दिवाळी या दिवसात खाद्यतेलाच्या विक्रीत दुपटीने वाढ होत असल्याची बाब ओळखून उत्पादक, वितरकांनी खाद्यतेलाची सुनियोजित वाढ केली. किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाची ११४ रुपये किलो दराने विक्री झाली. गेल्यावर्षीच्या दिवाळीत सोयाबीन तेलाचे दर १५ रुपयांनी वाढून १५२ रुपयांवर पोहोचले होते, हे विशेष.
पामतेलाचा आधार असलेले सोयाबीन तेलाचे दर उत्पादकांनी ठरवून वाढविले. दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला आणि फायदा स्टॉकिस्ट आणि ठोक व्यापाऱ्यांनी घेतला. कृत्रिम दरवाढीकडे सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने खाद्यतेल व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा नफा कमविल्याची चर्चा बाजारपेठेत आहे.
किरकोळमध्ये ११४ रुपये किलो; भेसळयुक्त तेलाची विक्री
दसऱ्याला सोयातेलाचे दर १०४ रुपये होते, तर दिवाळीआधीच ११४ रुपयांवर पोहोचले. दर आणखी कमी होण्याची शक्यता किरकोळ व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत असतानाच या दिवसात असे काय घडले की सोयातेलाचे दर प्रतिकिलो १० रुपयांनी वाढले. सणांच्या दिवसांत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आशीर्वादाने भेसळयुक्त तेलाची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचा आरोप ग्राहक संघटनांचा आहे.
सणांच्या दिवसात पाम तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढून किरकोळमध्ये ११० रुपयांत विक्री झाली. पुढील काळात पामतेलाचे दर आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीन बाजारालाही दरवाढीचा आधार मिळू शकतो, असा अंदाज आहे.
मोठ्या कंपन्या ठरवितात तेलाचे दर
तेल व्यापारी अनिल अग्रवाल म्हणाले, नागपुरात खाद्यतेलाचे लहान प्रकल्प आणि स्टॉकिस्ट आहेत. जास्त प्रमाणात तेल साठवणूक करण्याची नागपुरातील व्यापाऱ्यांची ‘एैपत’ नाही. मोठ्या कंपन्या खाद्यतेलाचे दर ठरवितात. आयातही मोठ्या कंपन्या जास्त प्रमाणात करतात आणि त्यानुसार दर ठरतात. त्यामुळेच नागपुरात सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो १० रुपयांनी वाढून ११४ रुपयांवर पोहोचले.
सोयाबीनचे व्यापारी कमलाकर घाटोळे म्हणाले, कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयाबीनचे दर दर्जानुसार प्रति क्विंटल ४५०० ते ५४०० रुपये आहेत. यावर्षी विदेशात सोयाबीनचे पीक गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच आहे. सोया ढेपला विदेशात मागणी आहे. सोयाबीनचे दर कमी होण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे.