चंद्रपूर जिल्ह्यात जाणारा दारूचा साठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:20+5:302021-05-05T04:14:20+5:30
भिवापूर : सीमावर्ती भागात नव्यानेच सुरू झालेल्या एका देशी दारूच्या दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध वाहतूक होणारा देशी दारूचा साठा ...
भिवापूर : सीमावर्ती भागात नव्यानेच सुरू झालेल्या एका देशी दारूच्या दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध वाहतूक होणारा देशी दारूचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत पकडला. यात २ लाख ६२ हजार ८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ७८ पेट्या व वाहन असा एकूण ९ लाख ६२ हजार ८० रुपयांचा माल जप्त करत आरोपीला अटक करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उमरेड-भिसी मार्गावर ही कारवाई करण्यात आली. संदीप सार्थिक मेश्राम (३०), रा. भिसी, जि. चंद्रपूर असे आरोपी वाहन चालकाचे नाव आहे. उमरेड-भिसी मार्गावरील सालेभट्टी फाट्यावर नव्याने स्थलांतरित झालेले देशी दारूचे एक दुकान दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाले. हा परिसर नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला गुंगारा देत दारूची मोठी वाहतूक येथून होत आहे. दरम्यान सोमवारी रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत गुप्त माहिती मिळाली. लागलीच त्यांनी आपला मोर्चा सालेभट्टी परिसरात वळवीत उमरेड-भिसी मार्गावरील ग्रिनपार्क नामक बारलगतच्या एका शेतात गुन्हे शाखेचे पथक दबा धरून बसले. काही वेळातच एक भरधाव स्कॉर्पिओ क्र. एम.एच.- ३१ बी.बी.- १७३७ हे वाहन येताना दिसले. लागलीच गुन्हे शाखेच्या पथकाने या वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या ७८ पेट्या आढळल्या. पोलिसी खाक्या दाखविताच सदर दारू लगतच्या दुकानातून आणल्याचे आरोपीने सांगितले. सदर कारवाई सहायक निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, राधेशाम कांबळे, बालाजी साखरे, भाऊराव खंडाते यांनी केली.
‘तो’ मद्य सम्राट कोण आहे?
उमरेड व भिवापूर हे दोन्ही तालुके चंद्रपूर जिल्ह्याला लागून असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात दारूची अवैध वाहतूक होते. स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. सुरुवातीच्या काळात दारूच्या अवैध धंद्यात गुंतलेले हे सर्व माफिया चंद्रपूर जिल्ह्यातील होते. मात्र गत वर्षभरापासून नव्या माफियांची संख्या वाढली आहे. अवैध दारूच्या उलथापालथीची सर्व चक्रे मद्यसम्राटाच्या उमरेड व हिंगणघाट येथील मुख्यालयातून हलत असल्याचे कळते. मात्र या सर्व गोरखधंद्यावर काही लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्यामुळे यंत्रणाही हतबल आहे, असा आरोप होत आहे.
---
जप्त केलेला दारूसाठा व आरोपीसह कारवाई करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.