नागपुरातील रामदेवबाबा मंदिरातून चक्क घोड्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 09:08 PM2020-04-17T21:08:36+5:302020-04-17T21:10:05+5:30
‘लॉकडाऊन’चा लाभ उचलत एका मद्यपीने चक्क रामदेवबाबा मंदिर परिसरातून घोडाच चोरी केल्याची बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लॉकडाऊन’चा लाभ उचलत एका मद्यपीने चक्क रामदेवबाबा मंदिर परिसरातून घोडाच चोरी केल्याची बाब समोर आली आहे. पोलीस ‘लॉकडाऊन’च्या व्यवस्थेत व्यस्त आहेत. याचा फायदा घेत पोलीस ठाण्यापासून काही पावले अंतरावर असलेल्या या घटनेनंतर गिट्टीखदान पोलिसांनी तातडीने सूत्रे हलविली व घोड्याला शोधून काढले.
मंदिराचे पुजारी सोमचंद्र ऊर्फ मुन्ना छांगानी यांच्याकडे बऱ्याच कालावधीपासून पाळीव घोडा आहे. ते मंदिर परिसरातीलच त्यांच्या घरासमोर त्याला बांधून ठेवतात. ११ एप्रिल रोजी कुणीतरी दोरी तोडून घोडा चोरला. छांगानी यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी केली असता महेश नगर निवासी साहिल पटेल रसीद पटेलकडे तसाच दिसणारा घोडा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हुडकेश्वर पिपला फाटा निवासी प्रमोद संपत लाडवे यांनी घोडा दिल्याचे सांगितले. प्रमोद हा घोड्यांचा प्रशिक्षक असून बजाजनगरातील काचीपुरा येथे तो प्रशिक्षण देतो. तेथे संबंधित घोडा सापडला.
साहिल हा मद्यपी असून त्याचे वडील प्रॉपर्टी डीलर आहेत. दारुचे व्यसन असल्याने साहिलला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे घोडा विकून पैसे मिळविण्याची त्याची योजना होती. घोडा चोरी केल्यानंतर त्याने फेसबुकवर प्रमोदशी संपर्क केला. घोडा माझ्या मालकीचा असून त्याला प्रशिक्षण द्या असे त्याने प्रमोदला सांगितले. मला साहिलचे सत्य माहीत नव्हते असा दावा प्रमोदने केला आहे. निरीक्षक सुनील गांगुर्डे, पीएसआय साजिद, हवालदार युवराज ढोले, संतोष उपाध्याय, इमरान शेख, संतोष शेंद्रे आणि आशीष बावनकर यांनी ही कारवाई केली.