चोरीची स्प्लेंडर, लॅपटॉप जप्त
By admin | Published: February 28, 2017 11:43 PM2017-02-28T23:43:36+5:302017-02-28T23:43:36+5:30
पाचपावली पोलिसांनी गेल्या दोन दिवसात चार सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकीसह ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - पाचपावली पोलिसांनी गेल्या दोन दिवसात चार सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकीसह ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हवलदार संजय वानखेडे हे आपल्या तपास पथकातील सहका-यांसह गस्त करीत असताना सोमवारी त्यांना चार खंबा चौकात मोहम्मद सरफराज अब्दुल सत्तार अंसारी (वय ३०, रा.पिवळी नदी, संघर्ष नगर) हा संशयास्पद अवस्थेत उभा दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्याजवळ असलेली स्प्लेंडर दुचाकी महेंद्रनगरातून चोरल्याची कबुली दिली. यासोबतच आरोपी सरफराजने मोहम्मद रफी चौकाजवळच्या जयप्रकाश हाउसिंग सोसायटीतील एका घरातून लॅपटॉप आणि मोबाईल चोरल्याचेही कबुल केले. पोलिसांनी आरोपीकडून दुचाकी, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला.
अशाच प्रकारे रविवारी पहाटे २ वाजता मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ हवलदार सय्यद सलिम आणि त्यांच्या सहका-यांनी संशयावरून मोहम्मद इम्तियाज मोहम्मद वकिल (वय २१), नसिम अहमद शफी अहमद (वय २१, दोघेही रा. अंसारनगर) आणि त्यांनी दिलेल्या माहितीनंतर शेख साजिद शेख प्यारे साहाब (रा मोमिनपुरा) याला अटक करून त्यांच्याकडून पाचपावलीतील एका लॉटरी सेंटरमध्ये झालेल्या टीव्ही चोरीचा तसेच किराणा दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. इम्तियाज आणि नसिमकडून चोरीचा टीव्ही तसेच शेख साजिद कडून किराणा दुकानात चोरलेल्या ४ हजार रुपये आणि अन्य साहित्यापैकी ८०० रुपये तसेच चिजवस्तूंसह १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, डी. एम. राठोड, हवलदार संजय वानखेडे, सय्यद सलिम, नायक सारिपुत्र फुलझेले, अविराज भागवत, शैलेन्द्र चौधरी, सचिन भिमटे, विजय जाने, सुनिल वानखेडे आणि शंभुसिंग यांनी ही कामगिरी बजावली.