पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:08 AM2021-09-23T04:08:56+5:302021-09-23T04:08:56+5:30
नागपूर : कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला असून, छोट्यामोठ्या व्यावसायिकांसह बहुतांश नोकरदारांचे उत्पन्न कमी झाले आहेत. काहींचे रोजगार ...
नागपूर : कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला असून, छोट्यामोठ्या व्यावसायिकांसह बहुतांश नोकरदारांचे उत्पन्न कमी झाले आहेत. काहींचे रोजगार हिरावले आहेत; पण सध्या कोरोना संसर्ग कमी झाल्याने परिस्थिती काहीसी सुधारत आहे. छोटे-छोटे व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. देशात करपात्र करदाते आयकर भरतात. सोबतच अप्रत्यक्ष कर हा प्रत्येकजण भरतो. यामध्ये प्रत्येकजण दैनंदिन जीवनात वस्तूंची खरेदी करताना किमतीवर अप्रत्यक्ष कर भरतोच. याउलट शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी आणि व्यापारी यांच्या उत्पन्नाची आकडेवारी ही कागदावर दिसून येते. परिणामी वार्षिक कर हा त्यांच्या माध्यमातून शासनाकडे जमा केला जातो; पण सर्वसामान्य नागरिकांसह हातावर पोट भरणाऱ्यांनी काय करायचे, त्यांच्याकडून मिळविणारे उत्पन्न इतके कमी असते की त्यांना पोट भरण्याची मारामार असते. मुळात उत्पन्न फारच कमी असल्याने मी टॅक्स कशाला भरू, अशी गरीब व सामान्यांची व्यथा आहे.
आपण टॅक्स भरता का?
- कामगार : उत्पन्न कमी असल्याने आयकर भरत नाही; पण सर्वच वस्तू खरेदीवर जीएसटी द्यावा लागतो.
- ऑटोचालक : ऑटो रिक्षा चालवून जनतेला सेवा देतो. उत्पन्न जास्त नसल्याने कर भरत नाही.
- भाजीपाला विक्रेता : सध्या या व्यवसायात उत्पन्न जास्त नसल्याने आयकर भरण्याचा प्रश्नच नाही.
- फेरीवाला : फेरीवाल्यांचे उत्पन्न किती, हे सर्वांनाच माहीत आहे. कर काय असतो, हे माहीतच नाही.
- सिक्युरिटी गार्ड : गार्डचा पगार २० हजार रुपये असला तरीही हातात १० ते १२ हजार मिळतात. यात कर कसा भरायचा?
- साफसफाई कामगार : हे काम करताना तुटपुंजा पगार हातात पडतो. यातून कर कसा भरणार? आम्ही सर्व वस्तूंवर कर देतोच.
- सलून चालक : छोट्या सलूनच्या व्यवसायात फारसे उत्पन्न नाही. त्यामुळे आम्हाला कर भरणे शक्य नाही.
- लॉन्ड्री चालक : आता या व्यवसायात उत्पन्न कमी झाले आहे. अल्पशा उत्पन्नातून कर कसा भरणार? सर्व वस्तूंवर जीएसटी वसूल केला जातो.
- घरकाम करणाऱ्या महिला : घरोघरी काम करून तुटपुंजा पगार मिळतो. त्यातून घर चालवितो. कर काय असते, हे माहीतच नाही.
देशात प्रत्यक्ष करापेक्षा अप्रत्यक्ष कराची वसुली सर्वाधिक
वार्षिक पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही. त्यामुळे देशात आयकराच्या टप्प्यात जवळपास ५ टक्के नागरिक येतात. या तुलनेत श्रीमंतांच्या उत्पन्नापेक्षा सामान्य नागरिक आपल्या उत्पन्नातून सर्वाधिक अप्रत्यक्ष कर भरतो. देशात सर्वच वस्तूंवर अप्रत्यक्ष कर (जीएसटी) वसूल करण्यात येतो. ब्रेड, तेल, साबण, बिस्कीट, मोबाईल रिचार्ज, पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदींसह बहुतांश सर्वच वस्तूंवर नागरिक जीएसटी भरतोच. कोरोना काळात अनेकांचे उत्पन्न कमी झाले आहे; पण सरकारची जीएसटीची वसुली सुरूच आहे. अशा लोकांनाही रिफंड मिळण्याची सोय सरकारने करावी.
सीए कैलास जोगानी, अर्थतज्ज्ञ.