मित्राचा दगडाने ठेचून खून : दोघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:46 PM2019-07-11T23:46:38+5:302019-07-11T23:47:37+5:30
किरकोळ वादातून तीन मित्रांमध्ये आधी भांडण आणि नंतर हाणामारी सुरू झाली. त्यातच दोघांनी तिसऱ्याच्या डोक्यावर दगड व लोखंडी पान्ह्याने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही मित्रांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळधरा शिवारात बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (हिंगणा) : किरकोळ वादातून तीन मित्रांमध्ये आधी भांडण आणि नंतर हाणामारी सुरू झाली. त्यातच दोघांनी तिसऱ्याच्या डोक्यावर दगड व लोखंडी पान्ह्याने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही मित्रांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळधरा शिवारात बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
पारस रमेश निरंजने (२२, रा. दहेली, जिल्हा चंद्रपूर) असे मृताचे तर योगेश अरुण पातूरकर (२९, रा. हुडकेश्वर, नागपूर) व पंकज गोपाळ पोहनकर (२८, रा. महेंद्री, ता. नरखेड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही मित्र असून, ते कारचालक म्हणून मेघा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करतात. या कंपनीची कान्होलीबारा (ता. हिंगणा) परिसरात कामे सुरू आहेत. पारस आपल्यापेक्षा वरचढ असल्याची भावना योगेश व पंकजच्या मनात निर्माण झाली होती.
दोघांनी पारसला बुधवारी रात्री योगेश चालवित असलेल्या एमएच-४०/एच-०२३१ क्रमांकाच्या झायलोने पिंपळधरा शिवारात नेले. तिथे त्याच्याशी वाद घालत दोघांनी मारहाण केली. शिवाय, डोक्यावर दगड व लोखंडी पान्ह्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर त्यांनी पारसचा मृतदेह शेतात टाकून देत पळ काढला. योगेशने पंकजला डोंगरगाव येथे सोडून दिले आणि नंतर तो हुडकेश्वरला गेला.
या संदर्भात पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या सूचनेवरून बुटीबोरी पोलिसांनी लगेच घटनास्थळाचा शोध घेतला. त्यांनी पारसचा मृतदेह ताब्यात घेत संशय आल्याने योगेश व पंकजला पहाटेच्या सुमारात ताब्यात घेतले. त्यानंतर योगेशने या गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळ हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बुटीबोरी पोलिसांनी तपास हस्तांतरीत केला.
पारसच्या खुनाची योजना ही पंकजने आखली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. योगेश डोंगरगावहून हुडकेश्वरला निघून गेल्यानंतर पंकजने स्वत: पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दोन अज्ञात व्यक्तींनी आम्हाला वाटेत अडविले आणि पारससोबत त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते दोघेही निघून पळून गेले, अशी खोटी माहिती दिली.