वंदे भारत ट्रेनवर भिलाईजवळ समाजकंटकाकडून दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 09:41 PM2022-12-15T21:41:47+5:302022-12-15T21:42:18+5:30
Nagpur News चार दिवसांपूर्वी मोठ्या थाटात शुभारंभ झालेल्या नागपूरहून बिलासपूर वंदे भारत हायस्पिड ट्रेनवर समाजकंटकाने दगडफेक केली. बुधवारी सायंकाळी ६. ९ वाजता भिलाई ते पॉवर हाऊस दरम्यान ही घटना घडली.
नागपूर : चार दिवसांपूर्वी मोठ्या थाटात शुभारंभ झालेल्या नागपूरहून बिलासपूर वंदे भारत हायस्पिड ट्रेनवर समाजकंटकाने दगडफेक केली. बुधवारी सायंकाळी ६. ९ वाजता भिलाई ते पॉवर हाऊस दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे ट्रेनच्या खिडकीचा काच क्षतिग्रस्त झाला असून या घटनेची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते बिलासपूर वंदे भारत ट्रेनला ११ डिसेंबरला हिरवी झेंडी दाखवली. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या ट्रेनचा सर्वत्र गाजावाजा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना या ट्रेनबाबत एक वेगळे आकर्षण निर्माण झाले आहे. असे असताना शुभारंभा नंतरच्या चवथ्या दिवशी बुधवारी सायंकाळी ही ट्रेन छत्तीसगडमधील दुर्ग जवळच्या भिलाई पॉवर हाऊसजवळून धावत असताना अचानक तिच्या एक्झिकेटीव्ह चेअर कार कोचच्या खिडकीच्या काचेवर दगड आदळला. खिडकीची काच रेसिन आणि विनिल कोट असल्याने ती फुटली नाही मात्र काचेवर दगडाचे निशान (क्रॅक) उमटले. ट्रेन हायस्पिड असल्यामुळे ही घटना लक्षात येईपर्यंत ती बरेच किलिमिटर अंतरावर निघून गेली होती. दरम्यान, अज्ञात समाजकंटकाने वंदे भारत ट्रेनवर दगड मारल्याची घटना घडल्याचे गार्ड वरुणकुमार यांनी अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. आरपीएफच्या माध्यमातून लगेच रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
क्षतिग्रस्त काच बदलविली
दरम्यान, खिडकीची क्षतिग्रस्त काच बदलवून वंदे भारतला पुढे मार्गस्थ करण्यात आले. याप्रकरणात रेल्वे पोलिसच्या निरीक्षक पोर्णिमा राय बंजारे यांनी दगडफेक करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.