रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक, जाब विचारणाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न
By योगेश पांडे | Published: March 24, 2023 04:20 PM2023-03-24T16:20:24+5:302023-03-24T16:20:52+5:30
पोलिसांना गुन्हेगारांच्या वाकुल्या : तात्या टोपेनगरजवळील मुख्य रस्त्यावर टवाळखोरांच्या कुरापती
नागपूर : शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावककर नगर चौकाजवळील मुख्य रस्त्यावर टवाळखोर तरुणांनी चक्क येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली व जाब विचारणाऱ्या व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
रोशन झाडे (३५, बुटीबोरी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. २२ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान ते त्यांच्या मित्रासोबत एमएलए हॉस्टेलवरून घरी जात होते. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंतेश्वरी झोपडपट्टीजवळील एका रेस्टॉरेन्टसमोर बसलेल्या तरुणांकडून वाहनांवर दगड फेकल्या जात होते. सागर गौतम झारीया (२२, दंतेश्वरी झोपडपट्टी), दुर्योधन मनोहर वर्मा (२२, धनगरपूरा वस्ती बजाजनगर), ओमकार गोवर्धन टेंभरे (२२, अत्रे ले आउट, दलपतशाह नगर, मोनु वर्मा (२०, दंतेश्वरी झोपडपट्टी) या तरुणांकडून ही कुरापत काढण्यात येत होती. या दगडफेकीत काही नागरिकांच्या वाहनांचे नुकसानदेखील झाले.
झाडे हे दुचाकीने जात असताना त्यांनादेखील दगड मारण्यात आला. झाडे यांनी गाडी थांबवून दगड का मारत आहात, असा जाब विचारला. यावर चारही आरोपी संतप्त झाले व त्यांनी झाडे यांना ओढत रस्त्याच्या कडेला नेले व त्यांच्या डोक्यावर मोठा दगड मारून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या दुचाकीचेदेखील नुकसान केले. त्यानंतर आरोपी फरार झाले. झाडे यांना खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व सागर झारिया, दुर्योधन वर्मा व ओमकार ढेंभरे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या झोपडपट्टीत गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले अनेक तरुण राहतात. मुख्य रस्त्यावर येऊन अनेकदा हे तरुण गोंधळ घालतात. मात्र पोलिसांची गस्त नसल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक नसल्याचे चित्र आहे.