सडक्या सुपारीचा गोरखधंदा बंद करा; पोलीस आयुक्तांची रोखठोक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 09:52 PM2021-12-21T21:52:30+5:302021-12-21T21:53:17+5:30
Nagpur News आरोग्यास घातक असलेली सुपारी विकणारांचे हात कायद्याच्या आडकित्यात पकडले जाईल, असा रोखठोक ईशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.
नागपूर - बाहेर देशातून आणलेली सडकी सुपारी विकून कुणी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असेल तर पोलीस मुग गिळून बसणार नाही. आरोग्यास घातक असलेली सुपारी विकणारांचे हात कायद्याच्या आडकित्यात पकडले जाईल, असा रोखठोक ईशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला. प्रारंभी त्यांनी सुपारी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ, एफडीए, डीआरआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची संयूक्त बैठक घेतली. त्यात सुपारीच्या नावावर केली जाणारी सडक्या सुपारीची तस्करी आणि कारवाईच्या संबंधाने प्रदीर्घ चर्चा झाली.
चार दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने सलग दोन दिवस छापेमारी करून पारडी तसेच लकडगंजमध्ये मोराणीपूर ट्रान्सपोर्टचे अनुप नगरिया आणि राजेश पहूजाच्या ताब्यातील साडेपाच कोटींची सुपारी जप्त केली. त्यांची गोदाम सील करून या दोन्ही गुन्ह्यात अनुपकुमार नगरिया (४५, सूर्यनगर), गब्बरसिंग रणजीतसिंग लोधी (२५, बंदरी मालढम, सागर, मध्य प्रदेश), अमित ग्यानचंद थारवानी आणि सुरेश रामप्रसाद सोनकुसरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी ही कारवाई करतानाच ईडी, डीआरआयलाही कारवाईबाबत माहिती देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे सुपारी तस्करांचे धाबे दणाणले. पोलीस आणि सुपारी तस्करांमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या काही दलालांनी पोलिसांवर दडपण आणण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबिण्याच्या सूचना केल्या. या पार्श्वभूमीवर, सुपारी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना भेटले. ही कारवाई चुकीची असल्याचे सांगून वसुलीसाठी सुपारी व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्तांनी ते ऐकून घेतल्यानंतर व्यापारी, एफडीए, डीआरआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांची संयूक्त बैठक घेतली. चांगल्या प्रतिच्या सुपारीच्या व्यवसायाला पोलिसांचा त्रास होणार नाही. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सडक्या सुपारीच्या तस्करांचा गोरखधंदा यापुढे चालणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना अमितेशकुमार यांनी सडकी सुपारी, तस्करी आणि पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.
श्रीलंका, इंडोनेशिया सारख्या देशातील सडलेली सुपारी उचलुन आणून सुपारी तस्कर भट्टी लावतात. गंधक आणि ईतर घातक रसायने टाकून ही सुपारी टणक तसेच शुभ्र बनिवली जाते. त्यानंतर खर्रा, सुगंधीत सुपारी, पान मसाला मध्ये ती विकली जाते. या सुपारीने अनेकांना वेगवेगळी व्याधी होते. रोग जडतात. अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळतानाच सुपारी तस्कर शासनाचा कोट्यवधींचा करही बुडवितात.
दुसऱ्याच नावाने सुपारी बोलविली जाते. कारवाईसाठी आलेल्यांना दुसरेच कागदपत्रे दाखवली जातात. हे संपूर्ण गैरप्रकार यापुढे चालणार नाही, असे आपण सुपारी व्यापाऱ्यांना सांगितल्याचेही आयुक्त म्हणाले.
१४ दिवसांत द्या अहवाल
पोलीस वेळोवेळी कारवाई करून एफडीएला बोलवितात. एफडीएचे अधिकारी नमूने जप्त करतात. नंतर मात्र काय होते, ते कळतच नाही. या संबंधाने प्रश्न उपस्थित केला असता, यापुढे कारवाईचे नमूने एफडीए आणि डीआरआयला दिली जाईल. या दोन्ही यंत्रणा दर्जा आणि कागदपत्रे तपासतील. त्यांनी १४ दिवसांत आपला अहवाल द्यावा, असे सांगण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले.
‘लोकमत’कडून वेळोवेळी पर्दाफाश
विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने सुपारीचा गोरखधंदा आणि तस्करांच्या नेटवर्कचा वेळोवेळी पर्दाफाश केला आहे. टोपणनावाने वापरणारे राहुल, राजू अण्णा, टिनू, आनंद, पंचमतिया, अनिल, आसिफ कलिवाला, बंटी, गनी खान, जतीन-हितेश, कॅप्टन, मोर्या, हारू, रवी, संजय आनंद, पाटना, इर्शाद, गनी, चारमिनार, बंटी आणि संजय या सुपारी तस्करांची नावेही सोमवारच्या अंकात प्रकाशित केली. या पार्श्वभूमीवर, काही दलालांनी पोलीस आयुक्तांना भेटण्याचा सल्ला दिला होता. मात्र, पोलीस आयुक्तांनी रोखठोक भूमीका घेतल्याने सुपारी तस्करांचा डाव उलटा पडला आहे. त्यामुळे सुपारी तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
----