‘सुपर’च्या रक्तपेढीतून रक्त देणे बंद!
By Admin | Published: August 29, 2015 03:09 AM2015-08-29T03:09:00+5:302015-08-29T03:09:00+5:30
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोज १२वर किचकट शस्त्रक्रिया होऊन १५वर रक्ताच्या पिशव्या लागतात.
रुग्णांच्या जीवाशी खेळ : मेडिकलने नेलेले ‘एलयाजा’ यंत्र दिलेच नाही
सुमेध वाघमारे नागपूर
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोज १२वर किचकट शस्त्रक्रिया होऊन १५वर रक्ताच्या पिशव्या लागतात. असे असतानाही ‘सुपर’च्या रक्तपेढीतील एकमेव ‘एलयाजा रिडर’ मेडिकल घेऊन गेले. धक्कादायक म्हणजे, हे यंत्र आठवडा होऊनही परत दिले नाही. यामुळे गुरुवारपासून रक्तपेढीतून रक्त देणे बंद झाले आहे. इतर रक्तपेढीतून उधारीवर रक्तपिशव्यांचा पुरवठा करण्याची वेळ या रक्तपेढीवर ओढावली आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास आवश्यक असणाऱ्या रक्तासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागू नये, म्हणून मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्तपेढीची सोय करण्यात आली. या हॉस्पिटलमध्ये विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातू रुग्ण येतात. रोज दोन न्यूरो सर्जरी, दोन बायपास सर्जरी, सहावर अॅन्जिओग्राफी, दहा डायलिसीस होतात. याशिवाय इतरही विभागात गंभीर स्वरुपाचे रुग्ण भरती असतात. यामुळे १५वर रक्तपिशव्यांची गरज भासते.
डागातून मागवावे लागते रक्त
नागपूर : रक्तदात्याने रक्त दिल्यानंतर ते साठवून ठेवण्याअगोदर काही चाचण्या करण्यात येतात. एचआयव्ही-१, एचआयव्ही-२, हेपिटायिटस - बी, हेपिटायिटस-सी, गुप्तरोग आणि मलेरिया या चाचण्या करून रक्तात रोगजंतू नसल्याची खात्री केली जाते. या चाचण्या ‘एलायजा रिडर’ यंत्रावर करण्यात येतात. यामुळे रक्तपेढीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे यंत्र असते. परंतु मेडिकलने हे यंत्रच घेऊन गेल्याने रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे बोलले जात आहे.
सूत्राने सांगितले की, सुपरच्या रक्तपेढीत जमा करून ठेवण्यात आलेल्या रक्ताच्या पिशव्या संपायला आल्या आहेत. अनेक रक्त गटाच्या पिशव्या उपलब्ध नाही. गुरुवारी एका रुग्णाला ‘बी पॉझिटिव्ह’ रक्ताची गरज पडली असताना त्याला मेडिकलमध्ये पाठविण्यात आले, परंतु येथे चक्क नाही म्हटल्यावर डागा रुग्णालयातून पाच रक्तपिशव्या मागविण्यात आल्या. शुक्रवारीही अशीच वेळ एका रुग्णावर आल्याची माहिती आहे.
रक्तसंक्रमण अधिकारीही एकच
४सुपरच्या रक्तपेढीत यंत्रासोबतच अपुरे मनुष्यबळ आहे. रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असताना दोन भरण्यात आली आहे. यातीलही एका अधिकाऱ्याची बदली मेयोत करण्यात आली. त्याच्या जागेवर अद्यापही कोणीच आलेले नाही. यामुळे एकच रक्तसंक्रमण अधिकारी आहे.
‘ब्लड कॉम्पोनन्ट सेपरेटर’ मशीनही नाही
४सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोजच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होतात. यामुळे रक्त व रक्तघटकाची उपलब्धता महत्त्वाची ठरते. परंतु रक्तपेढीत रक्तघटक वेगळे करणारी ‘ब्लड कॉम्पोनन्ट सेपरेटर’ मशीनच नाही. यामुळे रुग्णाला ‘होल ब्लड’ दिले जाते. ज्यांना ‘कॉम्पोनन्ट ब्लड’ची गरज असते, त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे.