नागपूर जिल्ह्यातील दोन लाख घरे तोडण्याची कारवाई बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:17 PM2019-02-21T22:17:29+5:302019-02-21T22:20:27+5:30
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागपूर जिल्ह्याच्या ७१९ ग्रामपंचायतीतील दोन लाख घरे अनधिकृत असल्याचे घोषित केले असून, ही घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे ही कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागपूर जिल्ह्याच्या ७१९ ग्रामपंचायतीतील दोन लाख घरे अनधिकृत असल्याचे घोषित केले असून, ही घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे ही कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सभापती शीतल उगले यांच्या वक्तव्यानुसार अनधिकृत घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. या कारवाईबाबत बोलताना प्रशांत पवार म्हणाले, या कारवाईमुळे दोन लाख घरमालकांचे आर्थिक नुकसान होऊन १५ लाख नागरिक बेघर होणार आहेत. प्राधिकरणाचा अहवाल सिंगापूरची कंपनी हॉलक्रोने गुगल नकाशाद्वारे तयार केला आहे. हा अहवाल दोषपूर्ण आहे. अहवालात दोन लाख घरे अनधिकृत असल्याचे नमूद नाही. अहवालामुळे दोन लाख घरे, ५० हजार कारखाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच १० लाख भुखंड अनधिकृत झाली आहेत. त्यांच्यावर कारवाई करून ३० कोटी रुपये जमा करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. गावकऱ्यांना, व्यापाºयांना, कारखानदारांना व भूखंडधारकांना त्रस्त करून त्यांच्याकडून पैसा वसूल करणे हा शासनाचा उद्देश आहे. यात ज्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांनी अनधिकृत बांधकामे केली त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतुद आहे. व्हीसीए स्टेडियमही अनधिकृत असून, या स्टेडियमवर ५ मार्चला होणारा सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पवार म्हणाले, व्हीसीए स्टेडियमची इमारत बेकायदा असून खेळाडू, प्रेक्षकांच्या जीवाशी व्हीसीएचे प्रशासन खेळत आहे. त्यामुळे या स्टेडियमवर कोणताही सामना न घेता पोलिसांनीही अशा सामन्यांना परवानगी देऊ नये. दोन लाख घरे तोडण्याची कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला जय जवान, जय किसान संघटनेचे सचिव अरुण वनकर, विजयकुमार शिंदे, मिलिंद महादेवकर, उत्तम सुळके, शेखर शिरभाते, रवींद्र इटकेलवार उपस्थित होते.