योग्य नियोजन होईपर्यंत नवीन सिमेंट रोड बांधणे थांबवा
By निशांत वानखेडे | Published: July 24, 2024 07:10 PM2024-07-24T19:10:06+5:302024-07-24T19:11:38+5:30
जनमंचकडून कळकळीची मागणी : प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागपूरकरांचे हाल
‘लाेकमत’ वृत्तमालिकेची दखल
नागपूर : २० जुलै राेजी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने नागपूरकरांची दाणादाण उडाली. एका दिवसाच्या अतिवृष्टीने शेकडाे वस्त्या जलमय केल्या. चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या सिमेंट रस्त्यांमुळेच शहराची ही दैनावस्था झाली, अशी टीका जनमंचने केली आहे. त्यामुळे यापुढे याेग्य नियाेजन हाेईपर्यंत नवीन सिमेंट राेड बांधणे थांबवा, अशी कळकळीची मागणी जनमंचने केली आहे.
गेल्या वर्षी २३ सप्टेंबर आणि यंदा २० जुलै राेजी नागपूरकरांनी पुराचा हाहाकार अनुभवला. अवघ्या ७ तासात २३२ मि.मी. पावसाची नाेंद झाली आणि या अतिवृष्टीमुळे अवघे शहर जलमय झाल्याचे दिसून आले. जवळच्याच नाही तर शहरातील पाॅश वस्त्यांनाही हा तडाखा बसला. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार या पुरस्थितीत जवळपास १० हजार घरांचे नुकसान झाले व नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कित्येकांचे संसार उघड्यावर आले. हा आकडा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे.
‘लाेकमत’ने पावसात केलेले सर्वेक्षणात अयोग्य पद्धतीने बांधलेल्या सिमेंट राेडमुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचे अधाेरेखित केले हाेते. जनमंचनेही या गाेष्टीची दखल घेतली. जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप म्हणाले, चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या सिमेंट राेडमुळेच नागपूरची अशी दैनावस्था झाली आहे. पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसणे, तसेच आजूबाजूच्या घरांपेक्षा रोडची उंची जास्त झाल्याने लाेकांच्या घरात पाणी शिरले. ही बाब सामान्य लाेकांना समजत असताना गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर सुधार प्रन्यास सारख्या शासकीय यंत्रणांना हे समजले नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांची जबाबदारी झटकून मुसळधार पावसालाच जबाबदार धरले जाते, हे दुर्देव हाेय.
रस्त्याची उंची आजूबाजूच्या घरांपेक्षा जास्त नसावी, तसेच पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था असावी. अशी व्यवस्था हाेईपर्यंत सिमेंट रोडची नवीन कामे थांबवण्याची मागणी जनमंचने पत्रकाद्वारे केली. या निवेदनात महासचिव विठ्ठलराव जावळकर, उपाध्यक्ष मनोहर रडके, खरसने, शरद पाटील, रमेश बोरकुटे, दादा झोडे, शिंदे, कोरडे, रामेकर, देवळे, भुसे, सावलकर, पांडे, राम आखरे, टी बी जगताप, निनावे, उत्तम सुळके, मिलिंद राऊत यांचा समावेश आहे.