‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा
By Admin | Published: October 28, 2015 03:02 AM2015-10-28T03:02:00+5:302015-10-28T03:02:00+5:30
समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या एका दिवंगत प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन
हायकोर्टात याचिका : बदनामीकारक चित्रपट असल्याचा दावा
नागपूर : समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या एका दिवंगत प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकाचा लहान भाऊ याचिकाकर्ता आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास संबंधित प्राध्यापकाची सर्वत्र बदनामी होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीने संबंधित प्राध्यापकाची भूमिका केली आहे.न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व ए. आय. एस. चिमा यांनी मंगळवारी याचिकेवर प्राथमिक सुनावणी केल्यानंतर केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव, सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे संचालक, मुंबई अॅकेडमी आॅफ मुव्हिंग इमेज (मामी), कर्मा पिक्चरच्या मालक हंसा मेहता व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून २९ आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. २९ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या मुंबई चित्रपट महोत्सवात ‘अलिगड’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. संबंधित प्राध्यापक अलिगड मुस्लिम विद्यापीठात कार्यरत होते. ९ फेब्रुवारी २०१० रोजी त्यांच्या समलैंगिकतेची सवय पुढे आली. यानंतर ९ एप्रिल २०१० रोजी ते स्वत:च्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. हा चित्रपट बुसान व लंडन चित्रपट महोत्सवातही दाखविणे प्रस्तावित आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. एम. अनिलकुमार यांनी बाजू मांडली.