शिक्षण क्षेत्रातील प्रयोग थांबवा! शालेय शिक्षण संघटनांचा सरकारला इशारा
By जितेंद्र ढवळे | Published: October 4, 2023 05:34 PM2023-10-04T17:34:00+5:302023-10-04T17:36:04+5:30
उपसंचालक कार्यालापुढे आंदोलन
नागपूर : राज्य सरकार शालेय व उच्च शिक्षणात दररोज नवनवीन शासन निर्णय घेऊन शिक्षण क्षेत्रात अराजकता निर्माण करीत आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि शिक्षकांना बसतो आहे. याविरोधात नागपुरातील शिक्षण संस्थांनी वज्रमुठ बांधली आहे. सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी शुक्रवार (दि.६) नागपुरातील शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयापुढे सर्व संघटनाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व विद्यार्थी, पालक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाचे सरकार्यवाह रविंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व सर्व शैक्षणिक संस्थाव्दारे राज्यभरातील लोकप्रतिनिधींना त्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात येत आहेत. नागपुरात विभागीय समन्वय समितीतर्फे महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरोधात आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके, आ. टेकचंद सावरकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुनील केदार व आ. विकास ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी शिक्षक आमदार नागो गाणार, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस, विभागीय कार्यवाह किशोर मासुरकर व राज्य कार्यकारिणी सदस्य आल्हादजी भांडारकर, मिलिंद बावसे उपस्थित होते.